Todays Top 10 News: 8 व्या वेतन आयोगाच्या नावाखाली बँक खाते रिकामे; तर दुसरीकडे सरपंचांची लॉटरी आणि भाजप आमदाराला बेड्या, वाचा टाॅप बातम्या
Todays Top 10 News: सरपंचांना मुदतवाढ, नागपुरात पेपरफुटी, भाजप आमदाराला अटक आणि भारतीय महिलांचा ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक विजय; वाचा १० मोठ्या बातम्या एकाच ठिकाणी.

Todays Top 10 News : मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर आता सरपंचांचीच ‘प्रशासक’ म्हणून वर्णी
राज्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींचा पेच सोडवत राज्य सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतलाय. २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर आता बाहेरील अधिकाऱ्यांऐवजी विद्यमान सरपंचांचीच प्रशासक म्हणून नियुक्ती केली जाईल.
विस्तार अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे प्रशासकीय कामात अडथळे येऊ नयेत, यासाठी हा बदल करण्यात आला असून सरपंचांना मदतीसाठी उपसरपंच व सदस्यांची समिती असेल. हा तात्पुरता कारभार निवडणूक होईपर्यंत किंवा पुढील सहा महिन्यांसाठी लागू राहील, ज्यामुळे ग्रामीण विकासातील सातत्य टिकून राहणार आहे.
सविस्तर वृत्त – आता सरपंचच असणार प्रशासक! राज्य सरकारचा मोठा निर्णय
अजितदादांना मोदी, शहाच न्याय देऊ शकतात; नागरी उड्डयण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा – रोहित पवार
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर गंभीर आरोप केलेत. अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाची चौकशी पारदर्शक होणार नाही, असा दावा करत त्यांनी नागरी उड्डयण मंत्री राममोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय.
टीडीपी आणि संबंधित व्हीएसआर कंपनीचे आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप पवारांनी केलाय. या प्रकरणात डीजीसीए स्तरावर कागदपत्रांची हेराफेरी होऊ शकते, त्यामुळे पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनीच यात लक्ष घालून अजितदादांना न्याय द्यावा, असे रोहित पवार म्हणाले.
शक्तीपीठ महामार्गाविरोधात 23 फेब्रुवारीला राज्यव्यापी एल्गार
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी २३ फेब्रुवारी रोजी राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय विरोधी संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला. काँग्रेसचे विधानपरिषदेचे गटनेते सतेज पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत झालेल्या ऑनलाइन सभेत हा ठराव झाला.
स्थानिकांचा विरोध डावलून सरकार हा प्रकल्प रेटत असल्याचा आरोप नेत्यांनी केला असून, अधिवेशनादरम्यान मुंबईत गोलमेज परिषदही भरवली जाणार आहे. प्रकल्प रद्द होईपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
नागपुरात बारावीचा पेपर फुटला; व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे परीक्षेपूर्वीच पेपर व्हायरल
नागपुरातील सेंट उर्सुला परीक्षा केंद्रावर बारावीचे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे पेपर परीक्षेपूर्वीच फुटल्याने खळबळ उडालीय. व्हॉट्सॲप ग्रुपवर सकाळी साडेदहा वाजता हे पेपर आले होते. परीक्षा केंद्रावरील स्वच्छतागृहात मोबाईल वापरणाऱ्या विद्यार्थिनीमुळे हा प्रकार उघडकीस आला.
या ग्रुपमध्ये २१ विद्यार्थी असून, खासगी शिकवणीच्या शिक्षकाने पैसे घेऊन पेपर पुरवल्याचा प्राथमिक संशय आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून शिक्षण मंडळाने केंद्रावरील सर्व कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली केलीय. सध्या पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
सविस्तर वृत्त – परीक्षेच्या आधीच व्हॉट्सअॅपवर बारावीचे पेपर; शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ
लाच घेताना भाजप आमदाराला रंगेहात अटक
कर्नाटकच्या शिरहट्टी मतदारसंघाचे भाजप आमदार डॉ. चंद्रू लमानी यांना लोकायुक्त पोलिसांनी ५ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. एका कंत्राटदाराकडून कामाचे बिल मंजूर करण्यासाठी त्यांनी एकूण ११ लाखांची मागणी केली होती.
गडग जिल्ह्यातील त्यांच्या रुग्णालयावर टाकलेल्या छाप्यात दोन स्वीय सहायकांनाही अटक करण्यात आलीय. लमानी हे पेशाने डॉक्टर आणि समाजसेवक असून २०२३ मध्ये ते पहिल्यांदाच निवडून आले होते. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
डोनाल्ड ट्रम्प यांचे भारतासोबतच्या व्यापारी करारावर भाष्य
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाला तेथील सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला असून त्यांचे अधिकार मर्यादित असल्याचे स्पष्ट केलेय. मात्र, या ट्रम्प यांनी भारतासोबतचा व्यापार करार कायम राहणार असल्याचे जाहीर केलेय.
ट्रम्प म्हणाले की, भारत १८ टक्के टॅरिफ देणे सुरूच ठेवेल आणि ही एक ‘फेअर डील’ आहे. न्यायालयाने टॅरिफ धोरण फेटाळले असले तरी दोन्ही देशांमधील व्यापारी संबंधांवर त्याचा परिणाम होणार नसल्याचा दावा त्यांनी पत्रकार परिषदेत केला.
8 व्या वेतन आयोगाच्या नावाखाली सायबर फसवणूक; बनावट सॅलरी कॅल्क्युलेटरपासून सावध राहा
८ व्या वेतन आयोगाबाबत सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये असलेल्या उत्सुकतेचा फायदा घेत सायबर भामट्यांनी फसवणुकीचे जाळे विणलेय. सोशल मीडियावर पगारवाढीचा आकडा तपासण्यासाठी बनावट ‘सॅलरी कॅल्क्युलेटर’ आणि एपीके (APK) फाईल्सच्या लिंक पाठवल्या जात आहेत.
या लिंकवर क्लिक करताच मोबाईलचा ताबा हॅकर्सकडे जात असून बँक खाती रिकामी होत असल्याच्या तक्रारी वाढल्यात. केंद्रीय गृह मंत्रालयाने यासंदर्भात कडक इशारा दिला असून, कोणत्याही अज्ञात फाईल्स डाऊनलोड न करण्याचे आवाहन केलेय. वेतन आयोगाबाबतचे सर्व अधिकृत अपडेट्स केवळ सरकारी संकेतस्थळावरच उपलब्ध होतील, असेही स्पष्ट करण्यात आलेय.
इंटरनेटशिवाय करा UPI पेमेंट; जाणून घ्या *99# या सुविधेचा वापर
डिजिटल व्यवहारांच्या युगात आता इंटरनेट संपले तरी तुमचे पेमेंट थांबणार नाही. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने NPCI *99# ही USSD आधारित विशेष सेवा सुरू केली असून, याद्वारे डेटाशिवाय पैसे पाठवणे शक्य आहे. यासाठी वापरकर्त्याला आपल्या बँक लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावरून फक्त हा कोड डायल करावा लागेल.
त्यानंतर स्क्रीनवर येणाऱ्या पर्यायांमधून ‘पैसे पाठवा’ निवडून समोरच्याचा नंबर आणि UPI पिन टाकल्यास व्यवहार पूर्ण होतो. ग्रामीण भाग किंवा कमी नेटवर्क असलेल्या ठिकाणी ही सुविधा अत्यंत उपयुक्त असून यासाठी प्रति व्यवहार केवळ ५० पैसे शुल्क आकारले जाते.
आर्यन खानला मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक’ पुरस्कार
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याने ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’ या वेबसीरीजद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात यशस्वी पदार्पण केलेय. या सीरीजच्या यशानंतर आर्यनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘बेस्ट डेब्यु डायरेक्टर ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
नेटफ्लिक्सवर जागतिक स्तरावर गाजलेल्या या सीरीजने प्रेक्षक आणि समीक्षकांची मने जिंकली असून, यापूर्वी त्याला ‘एनडीटीव्ही इंडियन ऑफ द इयर २०२५’ पुरस्कारही मिळालाय. रेड चिलीज एंटरटेनमेंट निर्मित या सीरीजने आर्यनची एक सक्षम दिग्दर्शक म्हणून ओळख निर्माण केली असल्याचे बोलले जातेय.
कांगारूंच्या भूमीत भारताचा ऐतिहासिक विजय; महिला संघाने जिंकली टी-२० मालिका
भारतीय महिला क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरात २-१ अशा फरकाने हरवून टी-२० मालिका खिशात घातलीय. ॲडलेड येथे झालेल्या निर्णायक सामन्यात भारताने १७ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना स्मृती मंधाना ८२ आणि जेमिमा रॉड्रिग्स ५९ यांच्या १२१ धावांच्या भागीदारीमुळे भारताने ६ बाद १७६ धावा केल्या.
प्रत्युत्तरात, भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजांवर वर्चस्व गाजवले. श्रेयंका पाटील आणि श्री चरणी यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेत यजमानांना ९ बाद १५९ धावांवर रोखले. १० वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात मालिका जिंकण्याचा पराक्रम हरमनप्रीत कौरच्या संघाने केलाय.








