Rohit Pawar press conference : मंत्री राममोहन नायडूंचा राजीनामा घ्या: रोहित पवारांची मोठी मागणी; म्हणाले “अजितदादांना नरेंद्र मोदी अन्…”
Rohit Pawar press conference : आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा दिल्लीत अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

Rohit Pawar press conference : शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यानी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधानानंतर पत्रकार परिषद घेत विमान अपघातावर संशय व्यक्त केला. विमान कंपनीवर देखील त्यांनी पत्रकार परिषदेत गंभीर आरोप करत त्याबाबतचे पुरावे सादर केले. यानंतर विमान अपघातात संशयाचे काहूर माजले आहे.
आज पुन्हा एकदा रोहित पवारांनी दिल्लीत विमान अपघाताविषयी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी थेट केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडूंच्या राजीमान्याची मागणी केली आहे. यासोबतच व्हिएसआर कंपनीला खूप मोठ्या लोकांचा पाठिंबा असल्याचा मोठा दावा केला आहे. यामुळे विमान अपघात प्रकरणात रोहित पवारांनी केलेल्या नवीन आरोप आणि दाव्यानंतर विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
रोहित पवारांनी विमान अपघाताबाबत पत्रकार परिषदेत छोटे प्रेझेंटेशन सादर केले. याद्वारे त्यांनी अजित पवारांच्या मृत्यूविषयी नवे पुरावे, तांत्रिक माहिती व तपासासाठी काही महत्त्वाचे खुलासे केले.”व्हीएसआर या कंपनीच्या पाठीशी खूप मोठे लोक आहेत. सत्ताधाऱ्यांना पाठिंबा देणारे काही लोक या कंपनीच्या पाठीशी आहेत.” असा मोठा दावा रोहित पवारांनी केला आहे. तसेच या अपघातात व्हीएसआर जबाबदार आहे, तर त्यांना वाचवणे कटाचा भाग असू शकतो, अशी शंका त्यांनी उपस्थित केली. नरेंद्र मोदी आणि अमित शाह फक्त हेच अजित पवारांना न्याय देऊ शकतात, असे मोठं विधान रोहित पवारांनी केले आहे.
व्हीएसआर कंपनीवर काय आरोप केले?
“व्हीएसआर नावाच्या कंपनीला खूप मोठ्या लोकांचा पाठिंबा असून यात सत्तेतील आणि राजकीय संबंध असलेले मोठे उद्योगपती सामील आहेत. हे एक राजकीय किंवा व्यावसायिक कटकारस्थान असू शकते आणि डीजीसीएचे मोठे अधिकारीही यामागे आहेत. अजित दादांना न्याय मिळवून देण्यासाठी या देशातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती, म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनीच या तपासात लक्ष दिले पाहिजे, कारण यात गुंतलेले इतर लोकही तितकेच प्रभावशाली आहेत. ”
केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांच्या राजीमान्याची मागणी
विमान अपघाताच्या चौकशी सुरू असून, काही दिवसांत यावर सविस्तर अहवाल येणार असल्याचे सांगितले जात आहे. अशातच रोहित पवारांनी थेट केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, “मी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनाही विनंती करतो की, त्यांनी हा विषय आपल्या हाती घ्यावा आणि नागरी उड्डाण मंत्र्यांचा राजीनामा मागण्यात आम्हाला साथ द्यावी, असे रोहित पवार म्हणाले.
व्हीएसआर कंपनीचे मालक आणि तेलुगु देसम पक्षाचे चांगले संबंध आहेत. सध्याचे केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री हे त्याच पक्षाचे आहेत. त्यामुळे विमान अपघात प्रकरणात निष्पक्ष तपास होईल का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. रोहित पवारांनी विमान अपघाताबाबत पत्रकार परिषदेत राजकीय कनेक्शन असल्याचे आणि एका पक्षाचे नाव घेतल्याने या प्रकरणात पुढे काय माहिती येणारे याकडे लक्ष असणार आहे.
हेही वाचा : Hadapsar: हडपसरमध्ये मजुरांच्या वसाहतीत आग; १९ झोपड्या जळून खाक






