Donald Trump : भारताबरोबरच्या व्यापारी करारामध्ये काहीही फेरबदल होणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचे स्पष्टीकरण
अमेरिकेतल्या सर्वोच्च न्यायालयाने आयात शुल्काबाबत ट्रम्प (Donald Trump) यांचे निर्णय रद्द ठरवल्यानंतर देखील भारताबरोबरच्या व्यापारी करारामध्ये कोणताही बदल होणार नाही, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे

Donald Trump : अमेरिकेतल्या सर्वोच्च न्यायालयाने आयात शुल्काबाबत ट्रम्प (Donald Trump) यांचे निर्णय रद्द ठरवल्यानंतर देखील भारताबरोबरच्या व्यापारी करारामध्ये कोणताही बदल होणार नाही, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. भारताबरोबर करार झाला आहे, यावर त्यांनी विशेष जोर दिला. भारताबरोबर माझे संबंध खूप चांगले आहेत.
दर महिन्याला २५ हजार लोक मृत्यूमुखी पडत असलेले भयंकर युद्ध आम्हाला थांबवायचे होते. म्हणून माझ्या विनंतीनंतर भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवले आहे, असे ट्रम्प शुक्रवारी व्हाइट हाउसमधील एका पत्रकार परिषदेत म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर आपले संबंध खूप चांगले आहेत, असेही त्यांनी सांगितले. भारत आणि पाकिस्तानमध्ये गेल्या वर्षी झालेले युद्ध आयात शुल्काच्या आधारे आपणच थांबवल्याचा दावा पुन्हा एकदा ट्रम्प यांनी केला.
या महिन्याच्या सुरुवातीला भारत आणि अमेरिकेदरम्यानच्या अंतरिम व्यापारी कराराचा आराखडा जाहीर करण्यात आला आहे. या व्यापारी कराराच्या आऱाखड्यानुसार अमेरिकेकडून भारतावर लावलेले २५ टक्के अतिरिक्त आयात शुल्क रद्द केले आणि मूळ २५ टक्के आयात शुल्काचे प्रमाण १८ टक्क्यांपर्यंत कमी केले आहे. त्यात आता काहीही बदल होणार नाही, असे ट्रम्प म्हणाले.





