Todays Top 10 News: अजितदादांच्या अपघाती मृत्यूचे गूढ वाढले ते ठाकरे सेनेचा भाजपला पाठिंबा, वाचा आजच्या टाॅप बातम्या

Todays Top 10 News: अजितदादांच्या अपघाती मृत्यूचे गूढ वाढले; आमदार रोहित पवारांनी व्यक्त केला गंभीर संशय
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांचे पुतणे आमदार रोहित पवार यांनी या अपघातावर अनेक खळबळजनक प्रश्न उपस्थित केलेत. हा निव्वळ अपघात नसून घातपात असावा, असा संशय त्यांनी व्यक्त केलाय. ऐनवेळी विमानाचे पायलट का बदलले आणि विमानाचा ट्रान्सपाँडर का बंद होता? विमानाने ‘मेडे’ कॉल का दिला नाही? मुंबईत थांबवण्यासाठी आणि कारऐवजी विमानाने जाण्यासाठी कोणी दबाव आणला होता का? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
तसेच इस्रायली गुप्तचर संस्थेच्या कार्यपद्धतीचा दाखला देत त्यांनी यामागे मोठे कारस्थान असल्याची शंका व्यक्त केली. विमान कंपनीच्या हलगर्जीपणावर बोट ठेवत त्यांनी या प्रकरणाची आंतरराष्ट्रीय संस्थांमार्फत चौकशी करण्याची मागणी केलीय. या सर्व गंभीर प्रश्नांमुळे अजित पवारांच्या अपघाती मृत्यूचे गूढ वाढले असून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडालीय.
सविस्तर वृत्त – अजितदादांचा अपघात की घातपात? रोहित पवारांचे गंभीर आरोप; सखोल चौकशीची मागणी
भाजप-ठाकरे सेना युतीमुळे काँग्रेसला धक्का; चंद्रपूर महापौर निवडणुकीत नवा राजकीय भूकंप
चंद्रपूर महानगरपालिका महापौर निवडणुकीत भाजप आणि शिवसेना उबाठा यांनी अनपेक्षित युती करत राजकीय समीकरणे बदलली आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपला पाठिंबा दिल्याने भाजपच्या संगीता खांडेकर यांनी काँग्रेसच्या वैशाली महाडोळे यांचा अवघ्या एका मताने पराभव केला. या विजयामुळे भाजपला महापौरपद तर ठाकरे गटाला स्थायी समितीवर नियंत्रण मिळाले आहे.
या धक्कादायक घडामोडीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, यात मोठा घोडेबाजार झाल्याचा आरोप केलाय. “ठाकरे गट महाविकास आघाडीत असतानाही त्यांनी भाजपला साथ का दिली? चंद्रपुरात साथ नाही, तर परभणीत आम्ही आमच्या सोयीने वागायचे का?” असा निर्वाणीचा सवाल सपकाळ यांनी विचारला. या प्रकरणाचा अहवाल हायकमांडला सादर करण्यासाठी सपकाळ तातडीने दिल्लीला रवाना झाले असून, यामुळे महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडल्याची चर्चा आहे.
सविस्तर वृत्त – भाजपने डाव साधला ! काँग्रेसच्या सुप्त संघर्षात चंद्रपूरमध्ये ‘कमळ’ फुललं
सुनेत्रा पवार यांनी स्वीकारला उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार; म्हणाल्या – ‘दादांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करीन’
अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी मंगळवारी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार अधिकृतपणे स्वीकारला. मंत्रालयातील दालनात प्रवेश करताना त्यांनी प्रथम दादांच्या खुर्चीला वंदन केले, यावेळी आईला त्या खुर्चीत पाहून पार्थ पवार भावूक झाले.
प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाचे दर्शन आणि चैत्यभूमीवर अभिवादन केल्यानंतर त्यांनी पदभार स्वीकारून थेट मंत्रिमंडळ बैठकीला हजेरी लावली. त्यांच्याकडे उत्पादन शुल्क, अल्पसंख्याक आणि क्रीडा ही खाती सोपवण्यात आली आहेत. “दादांची जागा कोणीही घेऊ शकत नाही, पण त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत जनसेवेचे त्यांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करीन,” असा निर्धार सुनेत्रा पवार यांनी यावेळी व्यक्त केला.
शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; ‘टास्क फोर्स’ची स्थापना
राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. यासाठी सरकारने एका विशेष ‘टास्क फोर्स’ची निर्मिती केली असून, असा प्रयत्न करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरलेय. केवळ आर्थिक मदत न देता शेतकऱ्यांच्या मनातील भीती आणि नैराश्य दूर करणे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी या निर्णयाची घोषणा केली.
हे कृती दल शेतकऱ्यांचे मानसिक आरोग्य, कुटुंबातील सामाजिक अडचणी आणि बदलत्या हवामानामुळे होणारे नुकसान यावर काम करेल. रफिक नाईकवाडी यांच्या नेतृत्वाखालील या गटात शेती तज्ज्ञांसोबतच मानसिक आरोग्य तज्ज्ञांचाही समावेश आहे. संकट येण्यापूर्वी आणि संकट आल्यानंतर शेतकऱ्याला आधार कसा देता येईल, याचा आराखडा हे दल तयार करणार आहे. या उपक्रमामुळे संकटात सापडलेल्या बळीराजाला योग्य वेळी मदत आणि धीर मिळण्यास मोठी मदत होणार आहे.
गोव्यात परवानगीशिवाय फोटो काढणे महागात; पोलिसांकडून कडक कारवाईचा इशारा
गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर आता पर्यटकांची छेड काढणे टवाळखोरांना महागात पडणार आहे. कोणत्याही पर्यटकाचा, विशेषतः विदेशी महिलांचा, त्यांच्या परवानगीशिवाय फोटो किंवा सेल्फी घेतल्यास पोलीस आता थेट कारवाई करणार आहेत.
गेल्या काही दिवसांत बागा आणि कळंगुट सारख्या प्रसिद्ध किनाऱ्यांवर महिलांचे छुप्या पद्धतीने व्हिडिओ बनवून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याचे प्रकार घडले होते. या घटनांमुळे गोव्याच्या पर्यटनावर वाईट परिणाम होत असल्याचे पाहून पोलिसांनी आता किनाऱ्यांवर कडक गस्त सुरू केलीय. काही जणांना आधीच ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेत. पर्यटकांना सुरक्षितपणे फिरता यावे आणि कोणाचीही प्रायव्हसी धोक्यात येऊ नये, यासाठी प्रशासनाने हे पाऊल उचललेय.
लोकसभा अध्यक्षांवर विरोधक नाराज; ओम बिर्लांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सध्या मोठा गदारोळ सुरू आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हे पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप करत काँग्रेसने त्यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणलाय. या प्रस्तावावर काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि द्रमुकसह एकूण ११८ खासदारांनी सह्या केल्यात.
विरोधकांचे मुख्य आक्षेप असे आहेत की, सभागृहात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना बोलू दिले जात नाही आणि विरोधी पक्षाच्या ८ खासदारांना विनाकारण निलंबित करण्यात आलेय. तसेच, सत्ताधारी भाजप खासदारांच्या वादग्रस्त विधानांवर अध्यक्ष कोणतीही कारवाई करत नाहीत, असा आरोपही विरोधकांनी केलाय. माजी लष्करप्रमुख नरवणे यांच्या पुस्तकावरून झालेल्या वादाचे निमित्त होऊन हा संघर्ष आता विकोपाला गेलाय. दरम्यान, तृणमूल काँग्रेसने मात्र या वादात तटस्थ राहण्याचा निर्णय घेतलाय.
सविस्तर वृत्त – लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव; विरोधक आक्रमक
पाकिस्तानमध्ये बेरोजगारीचे संकट; 21 वर्षांतील सर्वात वाईट स्थिती
पाकिस्तान सध्या मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला असून तिथे बेरोजगारीने उच्चांक गाठलाय. गेल्या २१ वर्षांतील ही सर्वात वाईट परिस्थिती असल्याचे समोर आलेय. २०२५ च्या शेवटी पाकिस्तानचा बेरोजगारीचा दर ७.१ टक्क्यांवर पोहोचला असून लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.
महागाई गगनाला भिडल्यामुळे सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण झालेय. जागतिक बँकेने इशारा दिलाय की, पाकिस्तानने येत्या १० वर्षांत ३ कोटी नोकऱ्या निर्माण केल्या नाहीत, तर परिस्थिती अजून गंभीर होईल. देशात काम मिळत नसल्यामुळे आता सुशिक्षित तरुण पाकिस्तान सोडून दुसऱ्या देशात निघून जात आहेत.
पॅन कार्डच्या टेन्शनमधून सुटका; आता ‘या’ व्यवहारांसाठी पॅनची गरज नाही
केंद्र सरकारने आयकर नियमांमध्ये मोठे बदल करण्याचा प्रस्ताव मांडलाय, यामुळे सर्वसामान्यांचे दैनंदिन व्यवहार सोपे होणार आहेत. नव्या नियमांनुसार, बँकेतील व्यवहारांबाबत मोठा दिलासा देण्यात आलाय. आता वर्षभरात १० लाख रुपयांपर्यंतची रोकड जमा करण्यासाठी किंवा काढण्यासाठी पॅन कार्ड अनिवार्य नसेल.
तसेच, २० लाख रुपयांपर्यंतची मालमत्ता खरेदी करताना आता पॅन कार्डची कटकट राहणार नाही. ५ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीची गाडी खरेदी करताना मात्र पॅन कार्ड द्यावे लागेल. महागाई वाढल्यामुळे लोकांसाठी हे नियम सोपे करण्यात आले आहेत, जेणेकरून छोट्या कामांसाठी वारंवार कागदपत्रांची धावपळ करावी लागणार नाही.
मनोज बाजपेयींच्या वेब सीरिजचे नाव बदलणार; नेटफ्लिक्सचा मोठा निर्णय
अभिनेता मनोज बाजपेयी आणि दिग्दर्शक नीरज पांडे यांची नवी वेब सीरिज वादात सापडल्यामुळे नेटफ्लिक्सने एक मोठा निर्णय घेतलाय. या मालिकेच्या नावावर एका विशिष्ट समाजाने आक्षेप घेतला होता. हा वाद इतका वाढला की प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयात पोहोचले.
मालिकेच्या नावामुळे लोकांच्या भावना दुखावत असल्याचा आरोप करण्यात आला होता. अखेर नेटफ्लिक्सने कोर्टात कबुली दिली की ते या वेब सीरिजचे नाव बदलणार आहेत आणि सध्या सर्व ठिकाणाहून त्याचे व्हिडिओ हटवण्यात आलेत. मनोज बाजपेयी यांनीही लोकांच्या भावनांचा आदर करत या निर्णयाला पाठिंबा दिलाय. आता ही वेब सीरिज नव्या नावासह प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
सविस्तर वृत्त – ‘घूसखोर पंडत’चे नाव बदलणार; वाद उफाळल्याने निर्मात्यांचा मोठा निर्णय
हर्षित राणाला दुसरा मोठा धक्का; T-20 वर्ल्ड कपनंतर आता IPLमधूनही बाहेर?
भारतीय वेगवान गोलंदाज हर्षित राणा याच्या दुखापतीबाबत एक मोठी अपडेट समोर आलीय. टी-२० विश्वचषक २०२६ मधून बाहेर पडल्यानंतर आता तो आगामी IPL 2026 हंगामालाही मुकण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सराव सामन्यात हर्षितच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली होती, ज्यावर नुकतीच मुंबईतील कोकिळाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आलीय.
या शस्त्रक्रियेनंतर त्याला प्रदीर्घ काळ विश्रांती आणि रिहॅबिलिटेशनची गरज असल्याने तो आयपीएलच्या बहुतांश सामन्यांना किंवा संपूर्ण स्पर्धेला मुकू शकतो. कोलकाता नाईट रायडर्ससाठी हा मोठा धक्का मानला जात असून, हर्षित लवकरच बेंगळुरू येथील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये आपली रिकव्हरी सुरू करेल.








