Sunetra Pawar Post : “दादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही; पण…”; उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्विकारल्यानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar Post : सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्विकारल्यानंतर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Sunetra Pawar Post : अजित पवार यांच्या निधानानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या. त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्याकडे अर्थ खाते वगळता इतर तीन महत्वाची खात्यांची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यानंतर त्या उपमुख्यमंत्री पदाचा पदभार कधी स्विकारणार याविषयी बोलले जात होते. अखेर ८ दिवसांनी आज १० फेब्रुवारी रोजी मंत्रालयात जात सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्विकारला. त्यानंतर त्यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
‘दादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही; पण त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा आणि अधिक सक्षम महाराष्ट्र घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी नक्की करेन.’ अशी पहिली प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पदभार स्विकारल्यानंतर दिली. तसेच आज राज्य मंत्रिमंडळाची दुपारी १२ वाजता बैठक होणार आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे मंत्रीमंडळाच्या बैठकीत अजित पवारांच्या जागी आता सुनेत्रा पवार या दिसणार आहेत. या बैठकीला त्या हजर राहण्याची शक्यता आहे.
आज महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारत असताना विश्वासाची, कर्तव्याची आणि त्यागाची जाणीव सुद्धा आहे. मा. अजितदादांनी आयुष्यभर महाराष्ट्राच्या जनतेसाठी झटत विकासाचा जो ध्यास घेतला, तोच माझ्यासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ आहे.
दादांची कार्यशैली, निर्णयक्षमता आणि… pic.twitter.com/5Tc2PsfDQ9
— Sunetra Ajit Pawar (@SunetraA_Pawar) February 10, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया
राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्विकारल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी एक्सवरून पोस्ट शेअर करत आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आज महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारत असताना विश्वासाची, कर्तव्याची आणि त्यागाची जाणीव सुद्धा आहे. मा. अजितदादांनी आयुष्यभर महाराष्ट्राच्या जनतेसाठी झटत विकासाचा जो ध्यास घेतला, तोच माझ्यासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ आहे, अशी भावना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली.
पोस्टमध्ये त्या पुढे असेही म्हणाल्या आहेत की, दादांची कार्यशैली, निर्णयक्षमता आणि लोकांशी असलेले आत्मीय नाते, हेच बळ घेऊन मी पुढील वाटचाल करणार आहे. त्यांच्या अपूर्ण स्वप्नांना पूर्णत्व देणे, शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देणे, हीच माझी प्राथमिकता असेल, असा शब्द त्यांनी महाराष्ट्रवासियांना दिला आहे.
या कठीण प्रसंगी जनतेने दिलेले प्रेम, आधार आणि विश्वास हेच माझे सामर्थ्य आहे. त्यांच्या स्मृतीपुढे आज मी एकच वचन देते की, महाराष्ट्राच्या हितासाठी निष्ठेने आणि समर्पणाने कार्य करत राहीन, असेही सुनेत्रा पवार यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
हेही वाचा : Breastfeeding: स्तनपान का आवश्यक? आई आणि बाळाच्या आरोग्याचं मजबूत नातं





