पुणे – राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या विनंती बदल्या करण्यासाठी मुहुर्त सापडला आहे. यामुळे अधिकाऱ्यांच्या “सोयी’नुसारच्या टप्प्याटप्प्याने बदल्या होऊ लागल्या आहेत.
करोनामुळे दोन वर्षे अधिकाऱ्यांच्या पुरेशा प्रशासकीय बदल्या व विनंती बदल्याही झाल्या नव्हत्या. बहुसंख्य अधिकाऱ्यांना एकाच कार्यालयात एकाच टेबलवर तीन वर्षांपेक्षा अधिकचा कालावधी पूर्ण झालेला आहे. काही ठराविक अधिकाऱ्यांची मक्तेदारीही वाढलेली आहे. ती मोडीत काढण्यासाठी बदल्या आवश्यक आहेत. काही अधिकारी सोयीच्या ठिकाणी बदल्या व्हाव्यात यासाठी विनंती अर्ज दाखल करतात. या बदल्यांसाठी अधिकारी मुंबई मंत्रालयाची अनेकदा वारीही करत असतात.
विनंती बदल्यांसाठी बहुसंख्य अधिकारी रांगेत आहेत. याबरोबरच अधिकाऱ्यांना प्रशासकीय बदल्यांचीही प्रतिक्षा लागलेली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतील अधीक्षक उत्तम खरात यांची महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या कार्यक्रम अधिकारीपदावर विनंती बदली नुकतीच झालेली आहे. अधीक्षक कृष्णा ढाळे यांची शिक्षण आयुक्तालयात बदली करण्यात आलेली आहे. योजना शिक्षण संचालनालयातील अधीक्षक शंशाक नेमळेकर यांची महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या कार्यक्रम समन्वयकपदी बदली झालेली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्कर बाबर यांची राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या शिक्षणाधिकारी पदी वर्णी लागली आहे. या सर्व अधिकाऱ्यांच्या विनंती बदल्या झालेल्या आहेत. दरम्यान बुलढाणा जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी किशोर पागोरे यांची यवतमाळला योजना शिक्षणाधिकारीपदी प्रशासकीय कारणास्तव बदली करण्यात आलेली आहे.