नवी दिल्ली – यंदाही प्रजासत्ताक दिनाचा (26 जानेवारी) मुख्य सोहळा परदेशी पाहुण्यांविनाच संपन्न होण्याची शक्यता आहे. त्या सोहळ्याला 24 हजार जणांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाऊ शकते.
प्रजासत्ताक दिनानिमित्त दोन वर्षांपूर्वी (2020) झालेल्या मुख्य सोहळ्याला उपस्थित राहण्याची परवानगी 1 लाख 25 हजार जणांना देण्यात आली होती. मात्र, मागील वर्षी करोना संकटामुळे सुमारे 25 हजारांच्या उपस्थितीलाच परवानगी मिळाली. यंदाच्या सोहळ्यावरही करोना संकटाचे सावट आहे. त्यामुळे मागील वर्षीप्रमाणेच यावेळीही परदेशी पाहुणे सोहण्यात दिसणार नाहीत.
प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या मुख्य सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून परदेशी मान्यवरांना निमंत्रित करण्याची प्रथा आहे. यावेळी उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, कझाकस्तान, ताजिकिस्तान आणि किरगिझ प्रजासत्ताकच्या नेत्यांना निमंत्रित करण्याचा प्रस्ताव होता. मात्र, करोना संकटामुळे तो मागे पडल्याचे समजते.
यंदाच्या सोहळ्याला उपस्थित राहण्याची अपेक्षा असलेल्या 24 हजार जणांपैकी 19 हजार जण निमंत्रित असतील. तर, उर्वरित उपस्थितांमध्ये सामान्य जनतेचा समावेश असेल. मुख्य सोहळ्यात सर्व करोनाविषयक नियमांचे पालन केले जाईल. सोशल डिस्टन्सिंग जपण्याच्या दृष्टीने आसन व्यवस्था केली जाईल. त्याशिवाय, उपस्थितांना मास्क अनिवार्य असेल.