नवी दिल्ली- भारतामध्ये समलैंगिक विवाहाबाबतच्या चर्चा जोरदार सुरु आहेत. अशातच युगांडा या देशाने समलैंगिक संबंधाविरोधात नवीन कायद्याची निर्मिती केली आहे. तसेच या कायद्याला युगांडा देशाचे राष्ट्रपती योवेरी मुसेवेनी यांनी मंजुरी दिली आहे.
युगांडा देशाच्या सरकारने समलैंगिक संबंधविरोधात नवीन कायदा आणला आहे. या कायद्यांतर्गत युगांडा देशामध्ये समलैंगिक संबंधांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
तसेच हा कायदा मोडणाऱ्यांना फाशीच्या शिक्षेची तरतूद लागू करण्यात आली आहे. हा कायदा सर्वप्रथम मसुदा संसदेत मांडण्यात आला होता. त्यानंतर आता राष्ट्रपती योवेरी मुसेवेनी यांनी या मसुद्यावर शिक्कामोर्बत करून हा कायदा अंमलात आणण्याची घोषणा केली आहे.
कायद्याचे पालन करण्याची घेतली शपथ –
हा कायदा मंजूर करताना युगांडातील खासदारांनी समलैंगिक संबंध हे समाजाच्या मूल्यांच्या विरोधात आहे घोषित केले आहे. तसेच खासदारांकडून कायद्याचे योग्य पालन करण्याची शपथही घेण्यात आली आहे. परंतु हा कायदा मंजूर होताच जगभरातून त्यावर टीका होऊ लागली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी दिला कारवाईचा इशारा –
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी ‘हा कायदा मानवाधिकारांचे उल्लंघन करणारा आहे’ असे म्हटले आहे. तसेच अमेरिकेतील युगांडाच्या अनेक अधिकाऱ्यांवर निर्बंध लादण्यासोबत अमेरिकन गुंतवणूक कमी करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.
दरम्यान, यापूर्वीही युगांडामध्ये समलैंगिक संबंधांवर बंदी घालण्यात आली होती. परंतु आता याचे थेट कायद्यात रूपांतर करण्यात आले आहे.तसेच युगांडाचे राष्ट्रपती योवेरी मुसेवेनी यांनी मंजूर केलेल्या कायद्याच्या मसुद्याला जगातील आतापर्यंतचा सर्वात कठोर कायदा मानला जात आहे.