मंचर -ओमायक्रॉनच्या संदर्भामध्ये पुणे येथे प्रशासन आणि अधिकारी यांच्याशी बैठक घेण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. लांडेवाडी येथील आयोजित करण्यात आलेली बैलगाडा शर्यत रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घेतले आहेत. यामध्ये कोणतेही राजकारण नाही, असे मत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त करीत शर्यतीवर सुरू असलेल्या राजकीय चर्चेवर पडदा टाकला.
पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी वळसे पाटील हे मंचर येथील जिल्हा परिषद शाळेत आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भीमांशकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे पाटील, बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष विष्णुकाका हिंगे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील,
पंचायत समितीचे सभापती संजय गवारी, तालुका कॉग्रेसचे अध्यक्ष राजू इनामदार, तालुका राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष अंकीत जाधव, कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अल्लु इनामदार उपस्थित होते. ते म्हणाले की, करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर सर्वांनी स्वत:चे आरोग्य जपावे.