नवी दिल्ली – बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) हिने शुक्रवारी राजकीय आकांक्षा उघड केली. भगवान श्रीकृष्णाची कृपा झाल्यास पुढील लोकसभा निवडणूक लढवेन, अशी भावना कंगनाने (Actress kangana) पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. द्वारकेतील (Dwaraka) प्रसिद्ध द्वारकाधीश मंदिराला भेट देऊन कंगनाने भगवान श्रीकृष्णाचे दर्शन घेतले.
यावेळी पत्रकारांनी तिला लोकसभा निवडणूक (loksabha 2024) लढवण्याविषयीचा प्रश्न विचारला. उत्तरादाखल तिने निवडणुकीच्या राजकारणात उतरण्याची तयारी असल्याचे सूचित केले. अयोध्येतील मंदिरात लवकरच भगवान श्रीरामाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा होईल. त्यासाठी कंगनाने भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारची प्रशंसा केली.
भाजप (Bjp) सरकारच्या प्रयत्नांमुळे आम्हा भारतीयांना 600 वर्षांच्या संघर्षानंतर तो दिवस पाहावयास मिळत आहे, असे कंगनाने म्हटले. कंगनाची भाजपशी असणारी जवळीक अनेकदा दिसून आली आहे.
भाजपच्या माध्यमातून सध्या अनेक अभिनेते-अभिनेत्री राजकारणात सक्रिय आहेत. त्या यादीत कंगनाचे नाव समाविष्ट होणार का याविषयीची उत्सुकता आता वाढली आहे. लोकसभा निवडणूक अवघ्या सहा महिन्यांवर येऊन ठेपली आहे. अशात कंगनाने राजकीय आकांक्षा जाहीर करून योग्य टायमिंग साधल्याचे बोलले जात आहे.