पिंपरी -वाकड पोलिसांनी एका उच्च शिक्षित चोरट्याला अटक केले आहे. हा चोर फक्त रुग्णालयांमध्येच चोऱ्या करत असल्याने पोलीसही चक्रावले आहेत. त्याच्याकडून पाच लाख 25 हजारांचे सात लॅपटॉप, 35 मोबाइल फोन असा पाच लाख 25 हजारांचा ऐवज जप्त केला आहे. या कारवाईमुळे सात गुन्हे गुघडकीस आले आहेत.
विकास संजय हगवणे (वय 30, रा. भुकूम, ता. मुळशी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 मे रोजी थेरगाव येथील एका हॉस्पिटल मधून लॅपटॉप चोरीला गेला. त्यानंतर 18 मे रोजी कस्पटे वस्ती येथील एका हॉस्पिटल मधून लॅपटॉप चोरीला गेला. 25 मे रोजी डांगे चौकातील एका हॉस्पिटलमधून मोबाइल चोरीला गेला. हॉस्पिटलमध्ये वाढलेल्या चोरीच्या घटनांमुळे पोलीस आयुक्तांनी तपासाच्या सूचना दिल्या.
वाकड पोलिसांनी तांत्रिक तपास केला असता तिन्ही घटनांमध्ये एकाच व्यक्तीने चोरी केल्याचे निष्पन्न झाले. सहाय्यक फौजदार बाबाजान इनामदार यांना माहिती मिळाली की, वाकड रोडवर एका लॅपटॉप विक्री दुरुस्तीच्या दुकानात पोलिसांनी सांगितलेल्या वर्णनाचा व्यक्ती लॅपटॉप विक्रीसाठी आला आहे. त्यानुसार पोलिसांनी विकास हगवणे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेला लॅपटॉप चोरीचा असल्याचे त्याने सांगितले.
चोरलेले मोबाईल फोन आणि लॅपटॉप स्वतःचे आहेत, हे भासवण्यासाठी त्याने विघ्नहर्ता मोबाइल शॉपी दुकानाच्या नावाने बिलबुक तयार केले. त्या बिलांचा वापर करून तो चोरी केलेले लॅपटॉप आणि मोबाइल फोन स्वतःचे असल्याचे भासवत आणि दुकानदारांना विकत होता. ज्या नागरिकांचे लॅपटॉप आणि मोबाइल फोन हॉस्पिटल मधून चोरीला गेले आहेत, त्यांनी वाकड पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी केले आहे.
नोकरी गेल्यानंतर सुरू केल्या चोऱ्या
आरोपी विकास हगवणे हा उच्चशक्षित आहे. तो वाघोली येथील आयटी कंपनीत नोकरी करत होता. करोना काळात त्यांची नोकरी गेली. त्यानंतर त्याने चो-या करण्यास सुरुवात केली. त्याने वाकड, पिंपरी, भोसरी, चतुःशृंगी, कोथरूड परिसरातील हॉस्पिटल मधून मोबाइल आणि लॅपटॉप चोरले आहेत. हॉस्पिटल परिसरात गर्दी असते. तिथून चोरी केल्यानंतर पळून जाण्यासाठी सोपे असते, त्यामुळे विकास हगवणे केवळ हॉस्पिटलमध्येच चोरी करत असे. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तो संपूर्ण हॉस्पिटल फिरून पाहत. त्यानंतर डॉक्टरांच्या केबिन आणि रुग्णांच्या खोल्यांमध्ये जाऊन तो लॅपटॉप आणि मोबाइल पळवत असे.
================