विश्रांतवाडी, दि. 11 (प्रतिनिधी) -वडगावशेरी मतदारसंघातील विमाननगर, कल्याणीनगर व पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळजवळ असणाऱ्या रस्त्यांची पाहणी आमदार सुनील टिंगरे यांनी पुणे वाहतूक पोलीस व पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत केली.
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळकडे जाणारी व विमानतळवरून येणारी वाहतूक ही प्रामुख्याने फाइव्ह नाइन चौकामधून होत असते. यामुळे फाइव्ह नाइन चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. येथे पाहणी करीत आमदार टिंगरे यांनी फाइव्ह नाइन चौकाचे रुंदीकरण करणे गरजेचे असल्याचे पालिकेचे पथ विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणुन दिले. फाइव्ह नाईन चौक ते स्काय बेलवेडेरे सोसायटी, विमाननगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या ठिकाणी रुंदीकरण करणे व तात्पुरते दुभाजक बसविणे आवश्यक असल्याचेही आमदार सुनील टिंगरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले.
आमदार सुनील टिंगरे यांनी बोलविलेल्या संयुक्त बैठकीमध्ये विमाननगर व कल्याणीनगरमधील नागरिकांनी वाहतूक पोलीस उपायुक्तांसमोर थेट समस्या मांडल्या.
यावेळी कल्याणीनगर आणि विमाननगर येथे आमदार सुनील टिंगरे, वाहतूक पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे, वाहतूक पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, वाहतूक पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, पथ विभागाचे उपअभियंता अमर मतीकुंड, कनिष्ठ अभियंता तांबारे, नानासाहेब नलवडे, माजी नगरसेविका मीनल सरवदे, सुहास टिंगरे, सोनसिंग सोना, आनंद सरवदे, अजय बल्लाल, राकेश म्हस्के व मनोज पाचपुते यांच्यासह कल्याणीनगर रेसीडंट असोसिएशनचे सभासद, विमाननगर व कल्याणीनगर मधील नागरिक उपस्थित होते.