काबूल – तालिबानने काबूल शहरातील एका कालव्यामध्ये तब्बल 3 हजार लीटर मद्य ओतून दिले आहे. तालिबानी शासनामध्ये मद्यविक्री आणि सेवनावर बंदी घालण्यात आली आहे. त्या नियमाची अंमलबजावणी म्हणून हे मद्य ओतून देण्यात आले आहे. गुप्तचर विभागाच्या महासंचलनालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका व्हिडीओमध्ये ही कारवाई दर्शवण्यात आली आहे.
राजधानी काबूलमध्ये घालण्यात आलेल्या छाप्यांदरम्यान जप्त करण्यात आलेले मद्य कालव्यामध्ये ओतून दिले जात असल्याचे ट्विटरवर पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये दिसत आहे. मद्य निर्मिती आणि मद्य वितरणापासून मुस्लिमांनी कटाक्षाने दूर रहायला पाहिजे, असे या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
काबूलमध्ये हे छापे कधी घातले गेले आणि हे प्रचंड मद्य कधी नष्ट केले गेले याचा स्पष्ट उल्लेख मात्र या व्हिडीओमध्ये करण्यात आलेला नाही. मात्र या कारवाईदरम्यान तिघा विक्रेत्यांना अटक करण्यात आली आहे, असे प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटलेले आहे. पाकिस्तानमधील वर्तमानपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे.
तालिबानने प्रथमपासूनच मद्याला इस्लामविरोधी मानले आहे. मद्य निर्मिती, वितरण आणि सेवन हे इस्लाममध्ये हराम मानले असल्याचे तालिबानने म्हटले आहे.