पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पाच डंपरद्वारे राडारोडा टाकून मिळकतीचा रस्ता बंद करण्यात आला. या प्रकरणात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे.
नागनाथ उर्फ नागेश गुलाब दांगट आणि सुदाम कोंडिबा दांगट( रा. शिवसृष्टीजवळ, आंबेगाव बु) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनसार, फिर्यादी विक्रम अमोलिक (४३, रा.शंकरशेठ रोड) यांनी २००६ साली गुलाबराव दांगट व इतरांकडून कायदेशीर जागा खरेदी केली होती.
या जागेवर गॅलेक्सी हिल पॅराडाईस एल.एल.पी. या कंपनीने निर्माण आॅरा हा गृह प्रकल्प सुरू केला. यातील ए विंगचे काम सुरू आहे. येथील नऊ मीटरचा रस्ता सर्वांसाठी खुला आहे.
फिर्यादी यानी २०१५ मध्ये कायमस्वरुपी रस्त्याबाबत सांमजस्य करार केला असून त्यामध्ये सर्व मिळकतधारकांनी रस्ता पूर्वीपासुन वहिवाटीकरीता वापरण्यास उपलब्ध असुन यापुढेही वहिवाटीसाठी उपलब्ध असेल असे म्हटले आहे. मात्र, अचानक फिर्यादीच्या मिळकतीचे प्रवेशद्वारावर आरारेपींनी डंपरद्वारे राडारोडा टाकून रस्ता बंद केला या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक समीर शेंडे करत आहेत.