प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 7 – वाढीव दराची निविदा मान्य करत तब्बल 1 कोटी 41 लाखांचा खर्च करत पालिकेने 150 फिरते विसर्जन हौद पुणेकरांसाठी उपलब्ध करून दिले. मात्र, पुणेकरांनी या हौदांऐवजी लोखंडी टाक्यांच्या कृत्रिम हौद तसेच मूर्ती संकलन केंद्रांवर विसर्जनास प्राधान्य दिल्याचे समोर आले आहे.
शहरात गेल्या सात दिवसांत 1 लाख 13 हजार 532 गणेशमूर्तींचे विसर्जन झाले असून, त्यातील केवळ 12 हजार 587 मूर्तींचे विसर्जन या हौदांवर झालेले आहे. फिरते हौद वेळेवर न येणे, हौदांच्या वेळा आणि ठिकाणे गैरसोयीचे असण्यामुळे पुणेकरांनी या हौदांना प्रतिसादच दिलेला नाही. त्यामुळे हा खर्च “पाण्यात’ जाण्याची शक्यता आहे.
महापालिकेकडून यंदा नदी प्रदूषणाचे कारण पुढे करत नदी तसेच कालव्यातील गणेशमूर्ती विसर्जनावर बंदी घातली आहे. तसेच नदीकाठावरील बांधीव हौदही उपलब्ध केलेले नाहीत. हे हौद नसतील, तर नागरिक गर्दी टाळण्यासाठी गेल्या दोन वर्षांप्रमाणे यंदाही फिरत्या हौदांवर विसर्जनास भर देतील असा समज करत पालिकेने यंदा150 हौदांसाठी निविदा काढली. त्यासाठी सुमारे 1 कोटी 41 लाखांच्या खर्चासही मान्यता देण्यात आली. मात्र, शहरातील अनेक भागांत लहान रस्ते असताना हे हौद मात्र मोठ्या ट्रकमध्ये आहेत. हे ट्रक शहराच्या मध्यवर्ती भाग तसेच वस्त्यांमध्ये जाऊ शकत नाहीत. परिणामी, ते मुख्य रस्त्यांवरूनच फिरत आहेत. काही भागात मुख्य चौकांमध्ये थांबून राहत आहेत. यामुळे या फिरत्या हौदांचा उपयोग नसल्याचे नागरिक
सांगत आहेत.
मूर्ती विसर्जन आणि ठिकाण
12,587फिरत्या हौदात
18,243नदीकाठी हौदात
65,962लोखंडी टाक्यांत
16,740मूर्तीसंकलन केंद्र