पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेची भरती प्रक्रिया गेल्या अनेक वर्षांपासून रखडली आहे. नुकतीच राज्य शासनाने सर्व महापालिकांना नोकर भरती करण्यास परवानगी दिली आहे. महापालिकेत 4292 पदांची भरती करण्यात येणार आहे. परंतु राज्यात विवादात अडकलेल्या भरती परीक्षा पाहता गैरव्यवहार टाळण्यासाठी महापालिका भरती प्रक्रिया स्वत:च राबविणार आहे.
दर महिन्यास किमान 50 ते 100 अधिकारी व कर्मचारी नियमित कालावधीनंतर तसेच, स्वेच्छा निवृत्ती घेऊन निवृत्त होत आहे. त्यामुळे मनुष्यबळ कमी आहे. तर दुसरीकडे दैनंदिन नागरी सुविधा पुरविताना महापालिकेवर ताण येत आहे. सद्यस्थितीत महापालिकेत विविध संवर्गातील 4292 पदे रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळाद्वारे कामकाज करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. अनेकांना अतिरिक्त पदभार सोपवून काम करून घेतले जात आहे.
राज्य शासनाने 2 जून 2015 च्या आदेशानुसार, कोरोना संक्रमण व लॉकडाऊनची परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील सर्व महापालिकेच्या खर्चावर निर्बंध आणले होते. तसेच, नोकर भरती स्थगित केली होती. त्यामुळे महापालिकेची नोकर भरती रखडली होती. उपलब्ध असलेल्या मनुष्यबळावर कामे उरकण्यावर महापालिका प्रशासनाने भर दिला होता. तसेच, मानधन व कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ भरण्याचा नवा पायंडा महापालिका पाडत आहे.
असे असताना महापालिका आस्थापनेवर नोकर भरती करण्याची मागणी वारंवार केली जात होती. दरम्यान, राज्य शासनाने महापालिका आस्थापनेवरील सरळ सेवेने विविध पदे भरण्यास नुकतीच मान्यता दिली आहे. महापालिकेच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेऊन प्रशासकीय खर्च 35 टक्के मर्यादेच्या आत राहील याची आयुक्तांनी दक्षता घ्यावी, अशी सूचना नगर विकास विभागाने महापालिकेस दिले आहेत. त्यामुळे महापालिका लवकरच नोकरी भरती करणार आहे. त्यामुळे रिक्त असलेले 4292 पदे लवकरच भरली जाणार आहेत.
आचारसंहितेपूर्वी राबवावी लागणार प्रक्रिया
महापालिकेची निवडणूक मुदतीमध्ये झाल्यास या महिन्याच्या अखेरीस आचारसंहिता लागू होऊ शकते. आगामी निवडणूक व आचारसंहिता लक्षात घेता महापालिका प्रशासन आता नोकरी भरती राबविणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. निवडणूक मुदतीमध्ये झाल्यास प्रशासनाला भरती प्रक्रिया आचारसंहिता लागण्यापूर्वी राबवावी लागणार आहे.