नवी दिल्ली – देशातील नवीन कोविड रूग्ण संख्येचा गेल्या सात महिन्यातील नीचांक आज नोंदवला गेला. गेल्या 24 तासांत देशात एकूण 14 हजार 146 नवीन कोविड रूग्ण आढळून आले आहेत.
हा गेल्या 229 दिवसांतील नीचांक आहे. गेल्या 24 तासांत एकूण 144 जण दगावले. गेल्या आठवडाभरात कोविड रूग्णांची संख्या पंधरा हजारांच्या खाली जाण्याची ही दुसरी वेळ आहे. 12 ऑक्टोबर रोजी देशात 14 हजार 313 रूग्ण आढळून आले होते.
गेल्या 24 तासांत देशातील ऍक्टिव्ह रूग्णांची संख्या 5786 ने कमी झाली. त्यामुळे देशातील एकूण ऍक्टिव्ह रूग्ण दोन लाखांच्या खाली गेले आहेत. कोविडचा रिकव्हरी रेट 98.10 टक्क्यांवर गेला आहे. मृत्यू दर 1.33 टक्क्यांवर आला आहे. कोविड मुळे देशात आत्तापर्यंत 4 लाख 52 हजार 124 लोक मरण पावले आहेत.