“लाडकी बहीण योजना ही माझीच संकल्पना आणि….”; पंकजा मुंडे यांचं भुवया उंचावणारे विधान

Pankaja Munde : महाराष्ट्रातील मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांमुळे रंगत वाढली आहे. गेल्या काही वर्षांपासून रखडेल्या या निवडणुका होत असल्याने राजकीय पक्षातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
या निवडणुकांच्या प्रचाराला सुरूवात झाली असून, येत्या काही दिवसांत प्रचारतोफा थंडावणार आहेत. तत्पूर्वी राज्यात ठिकठिकाणी पार पडत असलेल्या प्रचार सभांमधून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा उल्लेख नेते मंडळींच्या भाषणातून सातत्याने केला जात असून, ही योजना सुरूच राहणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणातून दिली आहे.
विधानसभा निवडणुकीप्रमाणेच नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीतही पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेची चर्चा सुरु झाली आहे. भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी देखील आता लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाचे वक्तव्य केले आहे. ही लाडकी बहीण योजना केलेली आहे, ही माझी संकल्पना आहे, असे वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केले आहे. यामुळे अनेकांच्या भुवय्या उंचावल्या आहेत.
या लाडक्या बहिणींमुळेच हे सरकार आलेलं आहे. यांनीच आम्हाला मंत्री केलं आहे, असे त्या पुढे बोलताना म्हणाल्या आहेत. परळीतील एका सभेत आपण तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लाडकी बहीण योजनेबद्दल कानावर घातलं होतं, असंही त्यांनी सांगितले आहे. पंकजा मुंडे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे स्थानिक निवडणुकांमध्ये ‘लाडकी’चा उल्लेख केंद्रस्थानी ठेवण्याचा प्रयत्न नेत्यांकडून केला जात आहे.
स्थानिक निवडणुकीतही ‘लाडकी’ची चर्चा
लाडकी बहीण योजनेमुळे मध्य प्रदेशांनंतर राज्यात सत्ता आली. त्यामुळे ही लाडकी बहीण आम्हाला विसरणार नाही. कारण ती कोणाचही घेतलेलं कधी विसरत नाही. मी पालक आहे तुमची. संपर्क मंत्री आहे बीडची. माझ्या लोकांना निवडून द्या मी स्वतः नगरपालिकेत जातीने लक्ष घालून काम करेन, अशी ग्वाही पंकजा मुडेंनी प्रचारसभेतून दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देवाभाऊ असेपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, अशी ग्वाही दिली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील हीच री ओढत योजना बंद होणार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा फायदा स्थानिक निवडणुकीत महायुतीमधील पक्षांना होणार का? यासाठी काही दिवसांची वाट पाहावी लागणार आहे.
हेही वाचा : निलेश राणेंचं स्टिंग ऑपरेनशन ते व्हाईट हाऊसच्या गोळीबारापर्यंतच्या टॉप १० बातम्या वाचा फक्त एका क्लिकवर





