Ladki Bahin yojana : लाडकी बहीण योजनेत तब्बल 26 लाख महिला अपात्र, आदिती तटकरेंनी दिली माहिती

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अंमलबजावणी दरम्यान मोठा गैरप्रकार समोर आला आहे. महिला व बालविकास विभागाने केलेल्या पडताळणीत तब्बल 26.34 लाख लाभार्थी अपात्र असल्याचे उघड झाले आहे.
या योजनेचा लाभ घेणाऱ्या काही महिलांनी एकापेक्षा जास्त सरकारी योजनांचा लाभ घेतल्याचे, काही कुटुंबांमध्ये दोनपेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे, तसेच काही ठिकाणी पुरुषांनीही या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. ही माहिती महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी जाहीर केली आहे.
महाराष्ट्र सरकारने 28 जून 2024 रोजी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केली होती. या योजनेचा उद्देश 21 ते 65 वयोगटातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दरमहा 1,500 रुपये (वर्षाला 18,000 रुपये) आर्थिक सहाय्य देऊन त्यांचे सक्षमीकरण करणे हा आहे. योजनेच्या पात्रतेसाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असणे, आधार लिंक्ड बँक खाते असणे आणि महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
मात्र, योजनेच्या अंमलबजावणीत गैरप्रकार आढळून आल्याने महिला व बालविकास विभागाने सर्व सरकारी विभागांकडून माहिती गोळा करून अर्जांची पडताळणी केली. माहिती व तंत्रज्ञान विभागाने सादर केलेल्या अहवालात 26.34 लाख लाभार्थी अपात्र असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे जून 2025 च्या हप्त्यासाठी या लाभार्थ्यांना लाभ नाकारण्यात आला आहे.
आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही महिलांनी ‘माझी लाडकी बहीण’ योजनेबरोबरच नमो शेतकरी महासन्मान निधी किंवा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनांचा लाभ घेतला. योजनेच्या नियमांनुसार, एकाच व्यक्तीला दोन सरकारी योजनांचा लाभ मिळू शकत नाही. तसेच काही कुटुंबांमध्ये दोन किंवा त्यापेक्षा जास्त महिलांनी योजनेचा लाभ घेतला, जे नियमांचे उल्लंघन आहे.
योजनेच्या निकषांनुसार, एका कुटुंबातील फक्त एक अविवाहित महिला किंवा विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिलांना लाभ मिळू शकतो. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, काही ठिकाणी पुरुषांनीही या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केले आणि काहींनी लाभही मिळवला. यामुळे योजनेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.





