शरद पवार गटाच्या नेत्यावर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला शरद पवार गटाचे नेते राम खाडे यांच्यावर बुधवारी रात्री जीवघेणा हल्ला झाल्याची खळबळजनक घटना समोर आलीय. दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. प्राथमिक माहितीनुसार, अहिल्यानगर – बीड जिल्ह्याच्या सीमेलगत मांदगाव जवळ हा हल्ला झाल्याची माहिती आहे. राम खाडे हे सामाजिक कार्यकर्ते आणि शरद पवार गटाचे पदाधिकारी आहेत. राम खाडे गाडीतून जात असताना दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने त्यांची गाडी थांबवून थेट हल्ला चढवला. राम खाडे यांच्यावर सुरुवातीला अहिल्यानगरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरु केला असून खाडे यांच्यावर हल्ला कोणी केला, हे अद्याप कळू शकलेले नाही. =================== निलेश राणेंचं स्टिंग ऑपरेनशन, भाजप कार्यकर्त्याच्या घरावर धाड शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी काल थेट मालवणमधील भाजपाचे पदाधिकारी विजय किंजवडेकर यांच्या राहत्या घरी धाड टाकली. निलेश राणे यांनी स्टिंग ऑपरेशन करत विजय किंजवडेकर यांच्या राहत्या घरी पोहोचले. यावेळी निलेश राणेंना विजय किंजवडेकर यांच्या राहत्या घरी अवैध आणि हिशोबी नसलेली मोठी रोख रक्कम आढळून आली.विजय किंजवडेकर यांच्या घरी बेहिशोबी 25 लाख रुपये मिळाले. एका खोलीत हिरव्या रंगाच्या पिशवीत हे पैसे असल्याचे दिसून आले. सदर घटनेनंतर निलेश राणेंनी निवडणूक विभागाच्या पथकाला आणि मालवण पोलिसांना पाचारण करुन कारवाई करण्याच्या सूचना केल्या. या पैशांचा निवडणुकीत गैरवापर होणार होता, असा गंभीर संशय व्यक्त केला जात आहे. रवींद्र चव्हाण मालवणमध्ये येऊन गेले, कालपासूनच वेगाने पैसे वाटपाची पद्धत सुरू झाली आहे, असे म्हणत निलेश राणे यांनी रवींद्र चव्हाण यांच्यावर आरोप केले. ============================= शिष्यवृत्ती परीक्षा रद्द ; नवी तारीख जाहीर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता 5 वी) व पूर्व माध्यमिक (इयत्ता 8 वी) ची शिष्यवृत्ती परीक्षा 2026 च्या तारखेत बदल करण्यात आलाय. आता ही परीक्षा 8 फेब्रुवारी 2026 ऐवजी 22 फेब्रुवारी 2026 रोजी राज्यभर एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) तर्फे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) देखील 8 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. राज्यातील अनेक प्राथमिक व माध्यमिक शिक्षक सीटीईटी परीक्षेला बसणार असल्याने त्यांच्याकडून शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख बदलण्याची मागणी करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर परिषदेने शिष्यवृत्ती परीक्षेचा दिवस बदलत नवीन तारीख 22 फेब्रुवारी 2026 जाहीर केलीय. ======================= महापालिका मतदार याद्यांतील घोळ समोर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात असून आता जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांचे वेध सर्वांनाच लागलेत. त्यासाठी, राजकीय पक्ष देखील कामाला लागलेत. निवडणूक आयोगाने यापूर्वी प्रारुप मतदार याद्या जाहीर केल्या आहेत. मात्र, या मतदार याद्यांमध्ये अद्यापही घोळ आणि दुबार मतदारांची संख्या मोठी असल्याने आता नव्याने मतदार प्रारुप याद्या तयार करण्यात येणारेत. कारण, एकट्या मुंबईतच 11 लाख दुबार मतदार आढळून आल्याने ठाकरे बंधूंचा दावा खरा ठरला आहे. आता, मतदार यादीचा सुधारीत कार्यक्रम आयोगाकडून जाहीर करण्यात आलाय. यापूर्वी अंतिम मतदार यादीसाठी 5 डिसेंबर ही तारीख होती, आता 20 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलीय. =============================== राज्यातील ‘या’ जागेवरील निवडणूकांना स्थगिती राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी मतदान येत्या 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. मात्रनिवडणूक आयोगाकडून एक निर्णय घेण्यात आला आहे. नगरपरिषदेच्या काही जागांवरील निवडणुकीला स्थगिती देण्यात आलीय. मनमाड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 10 मधील निवडणूक स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रभाग क्रमांक 10 मधून निवडणूक लढवणारे ठाकरे गटाचे उमेदवार नितीन वाघमारे यांचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने ही निवडणूक स्थगित करण्यात आल्याची माहिती आहे. मनमाडसह धुळ्याच्या पिंपळनेर नगरपरिषदेतील प्रभाग क्रमांक 2 ची देखील निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. तर, बीडच्या गेवराई नगर परिषद प्रभाग क्रमांक 11 अ च्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला उमेदवाराचे देखील हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. त्यामुळे या ठिकाणच्या निवडणुकांना स्थगिती दिलीय. ====================== पेट्रोल -डिझेलच्या किंमती निम्म्याने कमी होणार ? पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींबाबत भारतासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. अमेरिकन दिग्गज जे.पी. मॉर्गन यांनी ही भविष्यवाणी केली आहे. यानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती निम्म्याने कमी होतील असा अंदाज आहे. अमेरिकन दिग्गज जेपी मॉर्गनने भाकित केलंय. 2027 पर्यंत ब्रेंट क्रूड ऑइलच्या किमती 30 डॉलरपर्यंत पोहोचू शकतात. कारण तेलाचा पुरवठा मागणीपेक्षा खूपच जास्त आहे. ही बातमी भारतावर परिणाम करू शकते कारण भारत त्याच्या तेलाच्या गरजेच्या 85 टक्क्यांपेक्षा जास्त आयात करतो. यासाठी सरकारला मोठी रक्कम मोजावी लागेल. म्हणून, जर कच्च्या तेलाच्या किंमती निम्म्या झाल्या तर त्याचा थेट परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर होईल.” असं म्हटलं जातंय. =========================== हाँगकाँगमधील भीषण आगीत 44 जणांचा मृत्यू हाँगकाँगमधील तैपो याठिकाणी 7 बहुमजली इमारतींमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडलीय. या घटनेत आतापर्यंत 44 जणांचा मृत्यू झालाय तर 300 जण बेपत्ता असल्याची माहिती समोर येतीय. या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी तीन संशयितांना अटक केलीय. 700 हून अधिक अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्यासाठी आणि लोकांना बाहेर काढण्याचे काम केले. आतापर्यंत सुमारे ९० टक्के लोकांना बाहेर काढण्यात आलंय. मात्र, अजूनही बरेच लोक बेपत्ता असल्याची माहिती समोर येतीय. घटनेनंतर अनेक रस्ते बंद करण्यात आलेत. ही आग लेव्हल ५ म्हणून वर्गीकृत करण्यात आली आहे, जी सर्वात गंभीर आग आहे. ====================== ‘खूप मोठी किंमत मोजावी लागेल’- ट्रम्प अमेरिकेच्या वॉशिंग्टन डीसीमधील ‘व्हाईट हाऊस’जवळ तैनात असलेल्या नॅशनल गार्ड्सवर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडलीय. या घटनेनंतर अमेरिकेत मोठी खळबळ उडाली. या हल्ल्यात दोन नॅशनल गार्ड्स गंभीर जखमी झालेत. या नॅशनल गार्ड्सना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया देताना गंभीर इशारा दिला आहे. ‘खूप मोठी किंमत मोजावी लागेल’, असं ट्रम्प यांनी म्हटलंय. तसंच आपण या हल्लेखोरांना सोडणार नसल्याचं म्हणत त्यांनी इशारा दिलाय. दरम्यान, हे दोन्ही जवान वॉशिंग्टन डीसीमध्ये तैनात असलेल्या वेस्ट व्हर्जिनिया नॅशनल गार्ड्सचे सदस्य होते. =================== रोहित शर्माला आयसीसीचं ब्रॅड ॲम्बेसेडरपद रोहित शर्माची 2026 टी20 विश्वचषकासाठी ब्रँड अॅम्बेसडर म्हणून निवड करण्यात आली आहे. आयसीसी चेअरमन जय शाह यांनी स्वतः ही माहिती देत रोहितची अधिकृत घोषणा केली. दरम्यान, गेल्या आठवड्यात पहिल्या क्रमांकावरून घसरलेला टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा आता पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर गेला आहे. विशेष म्हणजे, या कालावधीत रोहितने एकही वनडे सामना खेळलेला नाही. तरीही तो पुन्हा नंबर वनचा दर्जा मिळवण्यात यशस्वी ठरला. यंदाच्या रँकिंगमध्ये वरच्या क्रमांकांवर फारसे बदल झाले नाहीत, मात्र टॉप-10 मधील खालच्या स्थानांवर थोडे फेरबदल दिसून आली आहेत. ================== मला स्वप्न ही मराठीमध्ये पडतात सुप्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगांवकरांनी नुकतंच उर्दू भाषेविषयी केलेल्या वक्तव्याने ते प्रचंड चर्चेत आले होते. त्यांनी आपली मातृभाषा जरी मराठी असली तरी आपण विचार उर्दूमधून करतो असं ते म्हणाले होते. त्यांच्या याच विधानाला आता ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी टोला लगावलाय . “मराठी मध्ये बोलताना शब्द शोधावे लागत नाहीत. ते पटकन तोंडी येतात… कारण, मला स्वप्न ही मराठीमध्ये पडतात. ती माझी मातृभाषा आहे…”, असं नाना म्हणाले. नाना पाटेकारांनी केलेलं हे वक्तव्य सध्या जोरदार व्हायरल होतय. नाना पाटेकरांनी बोलताना कुठेही सचिन पिळगांवकरांचा उल्लेख नाही पण अनेकांनी त्यांचं हे वक्तव्य सचिन पिळगांवकरांच्या उर्दू भाषेतील वक्तव्याशी जोडलंय .