प्रभात वृत्तसेवा तळेगाव ढमढेरे – येथील वेळ नदीच्या संवर्धन व सुशोभीकरणासाठी महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे. केंद्रीय नागरी विमानमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण व हवामान बदल मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे पत्र पाठवून या योजनेला पाठिंबा दर्शविला आहे. यामुळे वेळ नदीच्या संवर्धनासाठी आवश्यक अधिकृत मंजुरी मिळण्याच्या दिशेने मोठा टप्पा गाठला आहे. वेळ नदी सुशोभीकरण प्रकल्पास प्रशासकीय परवानगी मिळवण्यासाठी शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी प्रधान सचिव, पर्यावरण व वातावरण विभाग, महाराष्ट्र शासन, जयश्री भोज यांच्याकडे पत्र पाठवले आहे. या पत्रव्यवहारामुळे प्रकल्पास अधिकृत मान्यता मिळण्याच्या प्रक्रियेत मोठा टप्पा गाठला असून, वेळ नदीचे सुशोभीकरण प्रकल्प शिरूर तालुक्यातील पर्यावरणीय सुधारणा व पर्यटन विकासासाठीही महत्त्वपूर्ण ठरणार आहे. प्रकल्पामुळे नदी परिसरातील नैसर्गिक सौंदर्य टिकवता येईल, लोकांना आरामदायी आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक जागा मिळतील. यामुळे गावाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासही चालना मिळेल.या प्रकल्पाच्या माध्यमातून परिसरातील पर्यावरणीय उपक्रमांना चालना मिळेल, तसेच नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी जाणीवा निर्माण होतील. नदीच्या काठावर झुडपांची लागवड, सोयीसुविधा आणि स्वच्छता राखण्याचे काम केल्याने परिसराचे सौंदर्य वाढेल आणि पर्यटनासाठीही आकर्षण निर्माण होईल. सरपंच रोहिणी तोडकर यांनी सांगितले की, वेळ नदीचे संवर्धन व सुशोभीकरण हा प्रकल्प केवळ पर्यावरण सुधारणा नाही, तर गावाच्या सौंदर्यकरणासाठीही अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या योजनेअंतर्गत नदीच्या काठावर स्वच्छता मोहीम राबविणे, झुडपांची लागवड, पायवाटा तयार करणे, विश्रांतीच्या जागा निर्माण करणे, तसेच पर्यावरणपूरक सुधारणा करणे, यांचा समावेश आहे. या सर्व सुधारणा केल्यामुळे नदी परिसर नागरिकांसाठी आकर्षक, स्वच्छ आणि सुरक्षित होईल. या योजनेमुळे पर्यावरणीय जागरूकता वाढेल, नदीच्या पाण्याची गुणवत्ता सुधारेल, तसेच परिसंस्थेचे संवर्धन होईल. सरपंच रोहिणी तोडकर यांनी आश्वासन दिले की, प्रकल्पाची अंमलबजावणी वेळेत पार पडेल आणि गावकऱ्यांना त्याचा थेट लाभ मिळेल. स्थानिक प्रशासन, खासदार आणि केंद्रीय मंत्र्यांच्या पाठिंब्यामुळे या योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावी होईल, असे सरपंच रोहिणी तोडकर यांनी सांगितले.