महायुती की स्वबळ? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत फडणवीसांकडून शिंदे यांच्या भूमिकेला छेद?

नाशिक : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या रणनितीवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक येथील शिवसेना मेळाव्यात या निवडणुका महायुती म्हणून लढण्याची ठाम भूमिका मांडली होती. मात्र, शुक्रवारी नाशिकमध्ये भाजपच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत वेगळी भूमिका मांडत शिंदे यांच्या वक्तव्याला छेद दिला आहे.
नाशिक येथे गेल्या रविवारी झालेल्या शिवसेना (शिंदे गट) मेळाव्यात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कार्यकर्त्यांना निवडणूक जिंकण्याचा कानमंत्र देत महायुतीच्या एकजुटीवर भर दिला होता. त्यांच्या पाठोपाठ शुक्रवारी स्वामी नारायण केंद्रात भाजपच्या उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींची बैठक पार पडली.
या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मार्गदर्शन करताना महायुतीच्या रणनितीवर भाष्य केले. नाशिक महानगरपालिकेत भाजपने ‘१०० प्लस’चा नारा देत एकहाती वर्चस्व राखण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे महायुती एकत्र लढणार की स्वबळावर, याबाबत उत्सुकता होती.
प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शक्य तिथे महायुती एकत्र लढेल. मात्र, जिथे मित्रपक्ष तुल्यबळ असतील, तिथे मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात.
“महायुतीतील तीनही पक्षांनी पहिल्या दिवसापासून जिथे शक्य आहे तिथे एकत्र लढण्याचे ठरवले आहे. परंतु, ज्या ठिकाणी सर्व मित्रपक्ष तुल्यबळ असतील, तिथे मैत्रीपूर्ण लढती होतील,” असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. नाशिक महानगरपालिकेत युती झाल्यास ‘१०० प्लस’ जागा महायुतीच्या असतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
🕔 5.14pm | 10-10-2025📍Nashik.
LIVE | Media Interaction#Maharashtra #Nashik https://t.co/QAPm8vleAF
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 10, 2025
फडणवीस यांच्या या वक्तव्यातून राज्यातील सर्वच ठिकाणी महायुती एकत्र लढेल, असे नाही, हे स्पष्ट झाले आहे. यामुळे नाशिकसह इतर महानगरपालिका, नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुकीत महायुतीच्या रणनितीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. शिंदे यांच्या एकजुटीच्या भूमिकेला फडणवीस यांनी दिलेला हा छेद राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. आगामी काळात महायुतीची रणनीती कशी आखली जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





