Eknath Shinde : एकनाथ शिंदे तडकाफडकी दिल्लीदरबारी…; काल कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार, आज राजधानीत हजेरी

Eknath Shinde – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी तडकाफडकी दिल्लीला रवाना झाले. राज्यात भाजप आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष वाढलेला असताना शिंदे दिल्लीत जावून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. शिंदेसेनेच्या मंत्र्यांनी काल कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार घातला होता.
त्यानंतर शिंदेंचे मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले. भाजपकडून शिंदेसेनेच्या माजी नगरसेवकांना पक्षप्रवेश दिला जात असल्याने शिंदेंच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिंदे दिल्लीला रवाना झाले आहेत.
बुधवारी पोलीस विभागाचा एक कार्यक्रम होता. त्याचे निमंत्रण एकनाथ शिंदेंना देण्यात आले होते मात्र पण शिंदे या कार्यक्रमाला अनुपस्थित राहतील, अशी माहिती शिंदे यांच्या नगरविकास विभागाकडून देण्यात आली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांची उपस्थिती होती.
शिंदे यांच्या अनुपस्थितीची बरीचशी राजकिय चर्चा झाली. गेल्या काही दिवसांतील घडामोडी पाहता, शिंदे यांची गैरहजेरी चर्चेचा विषय ठरली. दिल्लीला रवाना झालेले शिंदे उद्या बिहारला जाणार आहेत.
उद्या पाटण्यात एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे. आपण एनडीएसोबत भक्कमपणे असल्याचा संदेश पाटणा दौऱ्यातून शिंदे देतील, अशी आशा राजकिय वर्तुळातून व्यक्त होत आहे.





