नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर इंडिया आघाडीला लागोपाठ हादरे बसत असून ममता बॅनर्जी यांच्यानंतर आता नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलानेही आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय जवळपास घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नितीश यांच्या संयुक्त जनता दलाला राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएमध्ये पुन्हा सामावून घेण्यास भारतीय जनता पार्टीनेही हिरवा कंदील दिला असून कोणत्याही क्षणी नितीश यांच्याकडून याबाबतची घोषणा होऊ शकते.
भाजपने बिहारमधील आपल्या सर्व आमदारांना दिल्लीला बोलावले असून बिहार विधानसभा भंग करण्याचा निर्णयही घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. दरम्यान, बिहार भाजपचे प्रदेशाध्यक्ष तसेच नितीश यांचे अत्यंत विश्वासू सहकारी हे दोघेही एकाच विमानाने दिल्लीला रवाना झाले आहेत.
बिहार विधानसभेमधील आताचे संख्याबळ
एकूण जागा -२४३
राजद- ७९
भाजप -७७
संयुक्त जनता दल -४५
कॉंग्रेस -१९
सीपीआय एमएल -१२
अन्य -९