राजगुरूनगर, (प्रतिनिधी) – राजगुरूनगर परिसरात 2 अल्पवयीन मुलीना उत्तेजीत औषधाचे इंजेक्शन देत दारू पाजून बलात्कार केल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली होती. ही घटना ताजी असतानाच पुन्हा शिरोली गावच्या हद्दीत आणखीन एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याने खेड तालुका हादरला असून आरोपीवर विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करून अटक केली. तर न्यायालयाने शुक्रवार (दि. 24) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
शिरोली येथील जाखमाता मंदिर परिसरातील झाडीत मंगळवारी (दि. 21) सायंकाळी साडेचारच्या सुमारास एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली. राम ऊर्फ रामेश्वर संजय राठोड (रा. वाघमारे वस्ती, चांडोली, ता खेड) याने मंगळवारी (दि.21) सायंकाळी साडेचारच्या सुमारास अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने दुचाकीवर बसून शिरोली गावच्या हद्दीत जाखमाता मंदिराजवळील झाडीत नेले. तिथे पीडित मुलीचे तोंड ओढणीने बांधून तिच्यावर बलात्कार केला. अल्पवयीन पोडीत मुलगी व तिच्या नातेवाइकांनी याबाबत खेड पोलिसांत फिर्याद दिली.
खेड पोलिसांनी राम उर्फ रामेश्वर संजय राठोड याच्या शोधासाठी दोन पथके तयार करून त्यास अवघ्या तासाभरातच पोलिसांनी बेड्या ठोकल्या. बुधवारी (दि.22) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने (दि. 24) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
खेड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राजकुमार केंद्रे, सहायक निरीक्षक काबुकडे, महिला उपनिरीक्षक माधवी देशमुख, उपनिरीक्षक डी. एन. राऊत, पोलीस शिपाई रामदास बोराडे, एच. डी. भांडे, आर. बी. दाते, स्वप्नील लोहार, नीलम वारे, कोठावळे, चालक असवले यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर धनवे करीत आहेत.
मुला-मुलींकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज
खेड तालुक्यात अल्पवयीन बलात्काराच्या घटनेने तालुका हादरला आहे.अल्पवयीन मुली, सज्ञान मुली घरातून पळून जाण्याचे प्रमाण अलीकडच्या काळात वाढले आहे. स्पर्धेच्या काळात आई वडील काम धंदा करण्यासाठी घरबाहेर असतात.
त्यातच मोबाईल मध्ये अती घातक व्हिडिओ अल्पवयीन मुली, महिला यांच्या मनावर परिणाम करून जातात त्यामुळे पालकांनी आपल्या लहान व वयात आलेल्या मुला-मुलींकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे.