शिक्रापूर, (वार्ताहर) – शिक्रापूर ते न्हावरा या रस्त्यावर आज पहाटेच्या सुमारास विटांची वाहतूक करणारा ट्रक रस्त्यावर उलटण्याची घटना घडल्याने या रस्त्याची दुरुस्ती करुन वळण सरळ करण्याची मागणी ग्रामस्थ व नागरिक करीत आहेत.
शिक्रापूर-न्हावरा रस्त्यावर अनेक ठिकाणी वेडीवाकडी वळणे तसेच रस्त्यावर तीव्र उतार आहेत तर अनेक लोकवस्तीच्या ठिकाणी रस्त्यावर गतिरोधक नसल्याने यापूर्वी अनेक अपघात होऊन काही नागरिकांना जीव गमवावा लागला तर काही नागरिकांना अपंगत्व आले आहे. यापूर्वी शेतकर्याचा बैलाचा सुद्धा मृत्यू झाल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती.
तर आज पहाटेच्या सुमारास न्हावरा बाजूने विटांची वाहतूक करणारा ट्रक (एमएच 12 एमव्ही 5566)येथील माळवाडी लगत असलेल्या वळणावर उलटून अपघात घडला. चालक किरकोळ जखमी झाला सुदैवाने अपघात रात्रीच्या वेळी झाल्याने रस्त्यावरील प्रवाशांचा धोका टळला गेला.
न्हावरा रस्त्यावर वेळोवेळी होणार्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी रस्त्यावर करण्याच्या दुरुस्ती बाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना कळवले होते; मात्र आता वेळप्रसंगी रस्त्यावर उतरुन आंदोलन उभारणार आहे. -नवनाथ भुजबळ, प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजयुमो