पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी, बारावीच्या लेखी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक निश्चित करुन ते जाहीर करण्यात आले आहे. इयत्ता बारावीची परीक्षा येत्या 21 फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा 1 मार्चपासून सुरु होणार आहे. यामुळे आता विद्यार्थ्यांना अभ्यासाची जोरात तयारी करावी लागणार आहे.
राज्यात पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत दहावी, बारावीच्या परीक्षा घेण्यात येतात. राज्य मंडळाकडून पुर्वी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. आता अंतिम वेळापत्रक जारी करण्यात आले आहे.
यानुसार इयत्ता बारावीच्या सर्वसाधारण व द्विलक्षी अभ्यासक्रमाची लेखी परीक्षा येत्या 21 फेब्रुवारी ते 19 मार्च या कालावधीत होणार आहे. बारावीच्या व्यवसाय अभ्यासक्रमाची परीक्षाही याच कालावधीत घेण्यात येणार आहे. माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान विषयांची ऑनलाईन परीक्षा 20 ते 23 मार्च या कालावधीत होणार आहे. दरम्यान इयत्ता दहावीची परीक्षा 1 ते 26 मार्च या कालावधीत होणार आहे.
बारावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 2 ते 20 फेब्रुवारी या कालावधीत होणार आहेत. इयत्ता दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 10 ते 29 फेब्रुवारी या कालवधीत घ्याव्या लागणार आहेत. दिनांकनिहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर गुरुवार (दि.2) पासून उपलब्ध होणार आहे.
मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकाची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपुर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापील स्वरुपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असणार आहे. त्या छापील वेळापत्रकावरुन परीक्षेच्या तारखांची खात्री करुन घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ठ व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले व व्हॉट्सऍप किंवा तत्सम माध्यमातून प्रसिध्द झालेले वेळापत्रक ग्राह्य धरु नये, असे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे.
सविस्तर वेळापत्रक खालील अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार
www.mahahsscboard.in