पिरंगुट-करमोळी (ता. मुळशी) येथे मुळा नदीकाठी असलेली गावठी दारूची भट्टी पौड पोलिसांनी उद्ध्वस्त केली. या कारवाईत 30 बॅरेल त्यामध्ये सहा हजार लिटर रसायन, 70 लिटर तयार दारू असा एकूण 78 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जागीच जाळून नष्ट करण्यात आला आहे.
राजू रणजीत प्राण नानावत व त्याचा साथीदार रविकांत मिरकांत नानवत असे हातभट्टी दारू काढून विकत असल्याची माहिती मिळाली असता पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ, उपनिरीक्षक अनिल लवटे, शिपाई मयूर निंबाळकर, सुनील कदम, नाना मदने, होमगार्ड मस्के यांनी या ठिकाणी छापा टाकला. पोलीस आल्याचे कळताच आरोपींनी त्या ठिकाणावरून पळ काढला.
पोलिसांनी पाहणी केली असता त्याठिकाणी 30 बॅरेल त्यामध्ये 6000 लिटर रसायन तसेच 70 लिटर तयार दारू असे एकूण सुमारे 78,500 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. हा मुद्देमाल सॅंपल काढून घेऊन जागीच जाळून नष्ट केला. आरोपीवर पौड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार संदीप सकपाळ हे पुढील तपास करीत आहेत.