नगर – लहान मुलांच्या भावविश्वाला साद घालणाऱ्या पप्पु की पगदंडी या बालचित्रपटाने उपस्थित बच्चे कंपनीची मने जिंकली.
कोणतेही काम लहान मोठे नसते. प्रत्येकाने आपल्यातील कलागुणांना वाव देत त्याला पुढे आणले पाहिजे तसेच त्यातून चांगली निर्मिती झाली पाहिजे, असा संदेश देणाऱ्या या चित्रपटाने या मुलांच्या मनाचा ठाव घेतला. मनोरंजनाबरोबरच शिकवणूकीचा बोध घेत आनंदाने मुले चित्रपटगृहाबाहेर पडतानाचे चित्र गुरुवारी पाहायला मिळाले.
निमित्त होते, केंद्र सरकारची बालचित्र समिती आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित बालचित्रपट महोत्सवाचे! बालदिनाचे औचित्य साधून (14 नोव्हेंबर) या बालचित्रपट महोत्सवास कार्निवल माय सिनेमा येथे प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, बालचित्र समितीचे प्रशासनिक अधिकारी राजेश गोहिल, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील, उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील, उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार उमेश पाटील, नाट्यचित्र अभिनेते मोहनीराज गटणे, अभिनेते प्रकाश धोत्रे आदींच्या उपस्थितीत या बालचित्रपट महोत्सवाचे उदघाटन झाले.
माय सिनेमा चित्रपटगृहाच्या प्रवेशद्वाराला लावलेले चित्रपट महोत्सवाचे आकर्षक बॅनर, रांगोळी आणि रंगीबेरंगी फुग्यांची सजावट आणि बालचमुंची गर्दी याने या महोत्सवाचे वातावरण भारुन टाकले. महानगरपालिकेच्या विविध शाळांतील मुलामुलींची चित्रपट पाहण्यासाठीची उत्सुकता आणि चित्रपटगृहात प्रवेश केल्यानंतर चेहऱ्यावर फुललेला आनंद आणि जसजसा चित्रपट पुढे सरकू लागला तसा मपप्पूफने त्यांच्या मनाचा घेतलेला ठाव याने बच्चेकंपनी कमालीची आनंदीत झाली.
चित्रपटाच्या माध्यमातून सामाजिकतेचा संदेशही त्यांच्या मनावर ठसला गेला.
तत्पूर्वी, उद्धाटन सत्रात जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनीही या बालचित्रपटांच्या माध्यमातून मुलांना चांगले चित्रपट बघण्याची संधी मिळणार असल्याचे सांगितले. बालदिनाच्या सगळ्या बच्चे कंपनीला शुभेच्छा देत जे जे आवडतं, ते मनापासून करण्याचा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. बालचित्र समितीचे श्री. गोहिल यांनी मुलांच्या भावविश्वाला चांगले वळण देणारे आणि शिकवण देणारे चित्रपट बालचित्र समिती तयार करत असते. हे चित्रपट मुलांना नक्कीच आवडतील, असे सांगितले. अभिनेते श्री. गटणे यांनी मुलांनी त्यांच्या कलागुणांचा विकास करावा.
अभ्यासासोबतच एका आवडीच्या कलाक्षेत्रात पारंगत व्हावे, असे सांगितले.
चित्रपटगृहात आकर्षक सजावट, रांगोळी काढणारे राष्ट्रपती पारितोषिक प्राप्त शिक्षक अमोल बागुल यांनी सूत्रसंचलन केले. उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील यांनी प्रास्ताविक व आभार मानले. उदघाटन सत्रावेळी प्रमुख मान्यवरांचा सत्कार रोपटे व पुस्तक देऊन करण्यात आला.
येत्या 19 नोव्हेंबरपर्यंत माय सिनेमा चित्रपटगृहात पप्पू की पगदंडी, आशा स्क्वेअर येथे पिंटी का साबुण आणि भागो भूत तर नाथगंगा (लोणी) येथे बंडू बॉक्सर हे चित्रपट दाखवले जाणार आहेत. हे चित्रपट सकाळी 8 ते 10-30 या वेळेत पाहता येणार आहेत. लहान मुलांसाठी प्रबोधन, प्रोत्साहन आणि जिज्ञासा जागृत करणारे आणि मनोरंजन करणारे चित्रपट मुलांना विनामूल्य पाहता येणार आहेत. या बालचित्रपट महोत्सवासाठी जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रमाकांत काटमोरे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) दिलीप थोरे, डिजीटल मीडिया माध्यम म्हणून सहकार्य करणारे आय लव नगर आणि लेट्स अपचे अक्षय मुनोत, प्रियंका चिखले आदींचीही उपस्थिती होती.