राजेंद्र वाघमारे
नेवासा – लोकनेते मारुतराव घुले – पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना भेंडे बुद्रूक (ता.नेवासा) येथील कारखाना व्यवस्थानाने 1 फेब्रुवारी 2023 ते चालु गळीत हंगाम बंद होईपर्यंत शेतकऱ्यांचे रोखीचे पेमेंट अद्याप केलेले नाही. कामगारांचे पगारही खोळंबलेले असून कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रकार घडला आहे. यामुळे कारखाना व्यवस्थापन डबघाईस आल्याची चर्चा शेतकऱ्यांसह कर्मचाऱ्यांतून दबक्या आवाजात चांगलीच जोरदारपणे चर्चिली जात आहे.
लोकनेते मारुतराव घुले – पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्यातून माहे फेब्रवारी ते गळीत हंगाम बंद होईपर्यंत ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे रोखीचे पैसे (पेमेंट) व कारखाना कामगारांचे पगारही करण्यात आलेले नाही. त्यामुळे कारखाना व्यवस्थापन तोट्यात चालले की, काय? असा सवालही ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह कर्मचाऱ्यांतून दबक्या आवाजात सुरु आहे. सहकार महर्षी लोकनेते स्व.मारुतराव घुले – पाटील यांनी उजाड माळरानावर नंदनवन फुलवून कारखाना उभा करुन शेतकरी व कामगारांचे हजारो कुटूंबे उभी केली.
या कारखान्यामुळे या परिसरात मोठा विकास आणि अर्थिक प्रगती झालेली असतांना कारखान्याच्या इतिहासातही कामगारांचे पगार आणि शेतकऱ्यांच्या ऊसाचे रोखीचे पेमेंट थकल्याचे असे कधीही झालेले नसतांना सध्या माञ कारखाना कर्मचाऱ्यांसह ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पेमेंटसाठी कारखान्यात चांगल्याच येरझऱ्या घालाव्या लागत असल्याचे दिसून आहेत.
तोंड दाबून बुक्क्यांचा मार
कारखान्याच्या इतिहासात कधीही कर्मचारी व शेतकऱ्यांचे पगार थकलेले नसतांना सध्या शेतकऱ्यांच्या रोखीचे (पेमेंट) व कर्मचाऱ्यांचा पगार थकल्यामुळे कामगारांना चांगलाच तोंड दाबून बुक्यांचा मार मिळत आहे.
बुरी नजर वालों तेरा मुंह काला
लोकनेते मारुतराव घुले – पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याना उजाड माळरानावर उभा करुन या परिसराची ही कामधेनू व अर्थिक जीवनदायिनी बनलेली आहे. या कारखान्याच्या आजपर्यंतच्या इतिहासात कधीही पेमेंट व कर्मचाऱ्यांच्या तक्रारी नव्हत्या. माञ पहिल्यांदाच असा प्रकार झाल्याने कारखाना व्यवस्थापनाला अर्थिक बळ येवो व ही कामधेनू संकटातून हद्दपार होवून बुरी नजर वालोंचे तोंड काळे होवू हिच अपेक्षा या कारखान्यावर अवलंबून असणाऱ्या घटकांची आहे.