Buldhana Bus Accident : समृद्धी महामार्गावर बुलढाण्यात प्रवासी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात २५ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार बसने पेट घेतल्याने या प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळील समृद्धी महामार्गावरुन विदर्भ ट्रॅव्हल्सची MH 29 BE – 1819 क्रमांकाची ही बस नागपूरहून पुण्याकडे जात होती. यादरम्यान मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. हा अपघात इतका भयानक होता की, मृतदेहाची ओळख पटणेही अवघड आहे. या घटनेची माहिती मिळताच भाजपचे नेते आणि माजी मंत्री गिरीष महाजन यांनी अपघात स्थळाची पाहणी केली. तसेच जखमींची विचारपूस केली.
यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना गिरीश महाजन म्हणाले की, “ड्रायव्हरला झोप आल्याने अपघात झाला असावा, यामुळे बस पोलवर जाऊन आदळली, असे आम्हाला समजते आहे. परंतू, ड्रायव्हरचे म्हणणे आहे की टायर फुटला आहे. याचा तपास केला जाणार आहे. कारण रस्त्यावर कुठेही टायर फुटल्याचे किंवा घसरल्याचे पट्टे दिसत नाहीत. यामुळे क्लिअरकट ड्रायव्हरला झोप लागली आणि बस पोलावर आदळल्याचे दिसत आहे. या अपघातात ड्रायव्हर, कंडक्टर यांना साधे खरचटलेलेही नाही.”
पुढे ते म्हणाले, “वेग देखील अपघाताचे कारण आहे. रस्ता चांगला आहे, परंतू वेगावर नियंत्रण आणायला हवे. यासाठी चालकांचे काऊंसेलिंग करावे लागणार आहे. १८०-२०० च्या वेगाने गाडी चालविणे धोक्याचे आहे. यामुळे अपघात होणारच. हे अपघात कसे रोखले जाईल यावर काम केले जाईल. ड्रायव्हर, कंडक्टरला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी केली जाणार आहे.” या घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही पाहणी करणार आहेत.
दरम्यान, ही बस यवतमाळची विदर्भ ट्रॅव्हल्स होती. ज्यात 33 प्रवासी होते. यातील 26 प्रवासी जळून खाक झाले आहेत. समृध्दी महामार्गावर झालेल्या अपघातासंदर्भात खासगी बसमधील जखमी / मृतक प्रवाशांच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी बुलढाणा कार्यालयात जिल्हाधिकारी कार्यालय आपत्ती व्यवस्थापन विभाग मोबाईल क्र.7020435954 व 07262242683 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.