हैदराबाद – कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज कॉंग्रेस पक्षाचा तेलंगणा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात तेलंगणासाठी सहा हमी आणि वेगवेगळ्या घोषणांचा समावेश आहे.
“अभय हस्तम” हा 42 पानांचा जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर खर्गे म्हणाले की, तेलंगणातील लोकांची मनस्थिती अशी आहे की, आता कॉंग्रेसला या राज्यात सत्तेवर आणल्याशिवाय गत्यंतर नाही. कॉंग्रेसच्या सहा हमींमध्ये निवडणुकीनंतर राज्यात पक्षाची सत्ता आल्यास महिलांना दरमहा 2500 रुपये आणि 500 रूपयांत गॅस सिलिंडर, तसेच सर्व घरांना 200 युनिट मोफत वीज देण्याच्या आश्वासनांचा समावेश आहे.
रायथू भरोसा योजने अंतर्गत, पक्षाने शेतकऱ्यांना दरवर्षी 15,000 रुपयांची गुंतवणूक मदत देण्याचे वचन दिले आहे, तर शेतमजुरांना 12,000 रुपये मिळतील. “चेयुथा” योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना रु. 4,000 सामाजिक पेन्शन आणि रु 10 लाख आरोग्य विमा संरक्षण दिले जाईल.खर्गे म्हणाले की, आम्ही कर्नाटकात ज्या हमी मतदारांना दिल्या होत्या त्या आम्ही प्रत्यक्षात अंमलात आणल्या आहेत.
महिलांना बसमध्ये मोफत प्रवास सुविधा दिल्याने कर्नाटकातील महिला विविध मंदिरांना भेट देत आहेत, मग त्या कोणत्याही धर्माच्या असोत. याच धर्तीवर आम्ही तेलंगणाला दिलेल्या सर्व सहा हमींची अंमलबजावणी करू,अशी ग्वाहीही त्यांनी दिली. ते म्हणाले की, “जाहिरनामा आमच्यासाठी गीता, कुराण किंवा बायबल सारखा आहे. पहिल्याच कॅबिनेट बैठकीत सर्व सहा हमी मंजूर केल्या जातील.