मिळकतकरात 11 टक्के वाढीचा प्रशासनाचा प्रस्ताव
पुणे- नवीन आर्थिक वर्षात पुणेकरांवर मिळकतकराच्या 11 टक्के करवाढीचा बोजा पडणार आहे. महापालिका प्रशासनाने 2022-23 या आर्थिक वर्षासाठी हा प्रस्ताव स्थायी समितीत ठेवला आहे. दरम्यान, महापालिका निवडणुकांच्या तोंडावर हा प्रस्ताव मंजूर होणार की नाही बाबत उत्सुकता आहे. गेल्या पाच वर्षांपासून पाणीपट्टीत होणारी वाढ मात्र पुढील आर्थिक वर्षापासून थांबणार आहे.
प्रशासनाकडून दरवर्षी मिळकत करात वाढ प्रस्तावित करण्यात येते. मात्र, गेल्या काही वर्षांत कोणत्याही करवाढीच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आलेली नाही. मागील दोन वर्षांत करोना संकटाचे कारण पुढे करत ही करवाढ फेटाळण्यात आली आहे. त्यानंतर आता प्रशासनाने पुन्हा 11 टक्के करवाढीचा प्रस्ताव ठेवला आहे.
पाणीपट्टी वाढली, पण पाणी तेवढेच
2022-23 मध्ये पुणेकरांना पाणीपट्टीच्या वाढीतून मात्र दिलासा मिळणार आहे. महापालिकेकडून शहरात तब्बल 2,500 कोटी रुपये खर्चून समान पाणीपुरवठा योजना राबवण्यात येत आहे. या योजनेत शहरात 85 पाण्याच्या टाक्या उभारणे, सुमारे 1,600 किलोमीटरच्या नवीन जलवाहिन्या टाकणे तसेच तब्बल सव्वातीन लाख पाणी मीटर बसविण्यात येणार होते.
त्यासाठी शहरातील पाणीपट्टी 72 टक्के वाढविण्यात येणार होती. त्यासाठी 2016 मध्ये पहिल्या वर्षी 12 टक्के, त्यानंतर पुढील चार वर्षे प्रत्येकी 15 टक्के वाढ करण्यात आली. त्यानंतर पाणीपट्टीत जवळपास 72 टक्के वाढ पूर्ण झालेली असली तरी, समान पाणी योजनेचे काम प्रत्यक्षात 40 टक्केच झालेले असल्याचे चित्र आहे.