मदुराई – तामिळनाडु सरकारच्या कामावर आक्षेपार्ह टीका केल्याच्या आरोपाखाली तामिळनाडु पोलिसांनी भाजप नेते एस जी सुर्या यांना शुक्रवारी उशिरा चेन्नई येथून अटक केली. त्यांनी सोशल मिडीयावर केलेल्या एका पोस्टवर आक्षेप घेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याची दखल घेत त्यांच्यावर ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
राज्य सरकारची ही कारवाई म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आहे असा आरोप प्रदेश भाजप अध्यक्ष के अन्नामलाई यांनी केला आहे. सुर्या यांना आयपीसी आणि आयटी कायद्याच्या कलमांखाली अटक करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले.या अटकेच्या कारवाईवर बोलताना भाजपने म्हटले आहे की, कम्युनिस्ट आणि द्रमुक या मित्रपक्षांच्या दुटप्पीपणाचा पर्दाफाश करण्याच्या चुकीबद्दल सुर्या यांना अटक करण्यात आली आहे. आमच्यावर अशा कितीही कारवाया झाल्या तरी आम्ही सत्य बोलल्याशिवाय राहणार नाही असा निर्धार भाजपने व्यक्त केला आहे.