नाशिक :- तलाठी परीक्षेत हायटेक कॉपीच्या प्रकारानंतर अनेक अपडेट समोर येत आहेत. अशातच नुकतीच पार पडलेली वनविभागाची परीक्षा देखील वादात सापडल्याची चिन्हे आहेत. याबाबत खुद्द नाशिक पोलिसांनी महत्त्वाची माहिती दिली असून तलाठी परीक्षेतील मुख्य आरोपी असलेल्या गणेश गुसिंगे याच्या मोबाईलमध्ये चक्क वनविभागाच्या प्रश्नप्रत्रिकाही आढळून आल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी दिली आहे.
नाशिकच्या तलाठी भरती परीक्षेत काही दिवसांपूर्वी हायटेक कॉपीचा प्रकार समोर आल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली. यानंतर संशयित आरोपी गणेश गुसिंगे यास ताब्यात घेतल्यानंतर अनेक प्रकार समोर आले.
पिंपरी-चिंचवड म्हाडाच्या परीक्षेतही हा त्याने काहीतरी घोळ केल्याची शक्यता आहे. अशातच गणेश गुसिंगे हा वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाकडून घेण्यात आलेल्या भरती परीक्षेत पास झाल्याचे समोर आले. या भरतीच्या परीक्षेमध्ये गणेश गुसिंगेला 138 गुण प्राप्त झाल्याची यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली.
नाशिक पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनीही या वृत्ताची पुष्टी केली आहे. या सर्व प्रकारामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याचे दिसून येते आहे. या सर्व प्रकारानंतर आता या परीक्षांच्या आयोजनावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.