मुंबई – ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी मनाला चटका लावणारी एक्झीट घेतली आणि संपूर्ण सिनेसृष्टी हळहळली. विक्रम गोखले आज आपल्यात नसले तरी ते कायम चित्रपटरूपाने रसिकांसोबत राहणार आहेत.याचाच प्रत्येय नुकताच ‘सूर लागू दे’ या सिनेमाच्या पोस्टर प्रदर्शनादरम्यान आला. सोशल मीडियावर ‘सूर लागू दे’ या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. यात अभिनेते विक्रम गोखले यांनी महत्वाची भूमिका साकारली आहे.
निर्माते अभिषेक ‘किंग’ कुमार आणि नितीन उपाध्याय यांनी ऑडबॉल मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली ‘सूर लागू दे’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. प्रवीण विजया एकनाथ बिरजे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. ‘सूर लागू दे’ या चित्रपटाच्या शीर्षकातच संगीताचा ताल दडलेला आहे. त्यानुसार या चित्रपटाचं कथानकही काहीशा वेगळ्या पठडीतील आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते विक्रम गोखले आणि सुहासिनी मुळये हे दोन दिग्गज कलाकार ‘सूर लागू दे’मध्ये मुख्य भूमिकेत आहेत. या निमित्तानं विक्रम गोखले आणि सुहासिनी मुळ्ये बऱ्याच दिवसांनी एकत्र काम करताना दिसणार आहेत.
सामाजिक जाणीवेचं भान राखून लिहिलेलं प्रेरणादायी कथानक या चित्रपटाचं मुख्य वैशिष्ट्य आहे. मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधनाचा वारसा जपत ‘सूर लागू दे’ फुल टू मनोरंजन करणार आहे. यात नात्यांची गोष्टही आहे. ‘सूर लागू दे’ या चित्रपटाचं लेखन आशिष देव यांनी केलं असून, संगीत पंकज पडघन यांनी दिलं आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.