मुंबई – अभिनेता सनी देओलचा बहूचर्चित ‘गदर 2’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. तब्बल 23 वर्षांनी गदरचा दुसरा भाग प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे या चित्रपटाची अनेकांना उत्सुकता होती. दिग्दर्शक अनिल शर्मा, सनी देओल आणि अमिषा पटेल आणि त्यांच्या पूर्ण टीमनं या चित्रपटाचे जोरदार प्रमोशनही केले आहे.
त्यामुळेच का होईना बॉक्स ऑफिसवर सध्या ‘गदर’ची हवा पाहायला मिळत आहे. सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 35 कोटींची कमाई केली आहे. तर दुसरीकडे खिलाडी कुमारच्या ‘ओएमजी 2’ने ओपनिंग डेला फक्त 10 कोटींची कमाई केली आहे.
त्यामुळे सनी देओलचा ‘गदर’ अक्षाच्या ‘ओएमजी 2’वर चांगलाच भारी पडला आहे. आता पर्यंत ‘गदर 2’ सिनेमाने तब्बल 40 कोटींचा आकडा पार केला असल्याचं दिसून आलं आहे.
या सिनेमात सनी देओल, अमिषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा मुख्य भूमिकेत आहेत. ‘गदर 2’मधील तारा सिंह आणि सकिनाची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.
दरम्यान, ‘गदर 2′ चे दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केले आहे. अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री अमीषा पटेलचा ‘गदर’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. शिख समाजाचा ‘तारासिंग’ आणि इस्लाम धर्मीय ‘सकिना’ यांच्या प्रेमाची कथा तूफान गाजली.
2001 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाची आजही मोठी क्रेझ आहे. या चित्रपटाच्या यशानंतर ‘गदर 2’ ची घोषणा करण्यात आल्यानंतर अखेर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.