पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या लेखी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा 2 मार्च पासून सुरु होणार आहे. आता विद्यार्थ्यांना जय्यत तयारीने परीक्षेच्या अभ्यासाला लागावेच लागणार आहे.
करोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षात शैक्षणिक वर्षाची घडी विस्कटली होती. त्यामुळे परीक्षांचेही वेळापत्रक कोलमडले होते. यंदा 2022-23 हे शैक्षणिक वर्ष सुरळीत सुरु झाले आहे. राज्य मंडळाने पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागात परीक्षा घेण्याची तयारी सुरु केलेली आहे. बारावीची सर्वसाधारण व द्विलक्षी विषय व व्यवसाय अभ्यासक्रम परीक्षा 21 फेब्रुवारीला सुरु होणार असून 20 मार्चला संपणार आहे. दहावीची परीक्षा 2 मार्चला सुरु होणार असून 25 मार्चला संपणार आहे. दिनांक, विषयनिहाय सविस्तर वेळापक राज्य मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे.
राज्य मंडळाच्या संकेतस्थळावरील संभाव्य वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापील स्वरुपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असणार आहे. छापील वेळापत्रकावरुन परीक्षेच्या तारखांची खात्री करुन घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेला प्रविष्ठ व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले व व्हॉट्सऍप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरु नये, अशा सूचना राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी जारी केल्या आहेत. प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी राज्य मंडळाकडून शाळा, महाविद्यालयांना पाठविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
वेळापत्रकाबाबत काही सूचना, हरकती असल्यास संबंधित विभागीय मंडळाकडे व राज्य मंडळाकडे 15 दिवसांच्या आत लेखी स्वरुपात पाठवाव्यात. मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या सूचनांवर विचार केला जाणार नाही.