लखनौ – माफिया अतिक अहमदची पत्नी शाइस्ता परवीनचा शोध घेण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. उमेश पाल खून प्रकरणातील आरोपी शाइस्तावर 50 हजारांचे बक्षीस आहे. मुलाचा एन्काउंटर, पती आणि मेहुण्याच्या हत्येनंतरही शाइस्ता परवीन अद्याप पुढे आलेली नाही. एसटीएफ प्रयागराजपासून मुंबई आणि दिल्लीपर्यंत तिचा शोध घेत आहे.
शाइस्ताचे वडील फारुख हे यूपी पोलिसात कॉन्स्टेबल होते. शाइस्ताचा जन्म प्रयागराजच्या दामूपूर गावात 1972 मध्ये झाला. चार बहिणी आणि दोन भावांमध्ये शाइस्ता सर्वात मोठी आहे. शाइस्ता पदवीधर आहे. वर्ष 1996 मध्ये शाइस्ता 24 वर्षांची असताना तिचा विवाह अतिक अहमदशी झाला. त्यावेळी राज्यातील बड्या माफियांमध्ये अतिकची गणना होत होती. तसेच अतिक तीनदा (1989, 1991, 1993) अपक्ष आमदार म्हणून निवडून आला होता.
यानंतर अतिकला समाजवादी पक्षातही प्रवेश मिळाला. 1996 मध्ये तो सपाच्या तिकिटावर चौथ्यांदा आमदार झाला. त्यानंतर 2002 मध्ये तो पाचव्यांदा आमदार झाला. तर 2004 मध्ये फुलपूरमधून खासदारही झाला.
अतिक आणि शाइस्ता यांना एकूण पाच मुले आहेत. मोठा मुलगा उमर, अली, असद आणि दोन लहान मुले. यामध्ये असदचा ताज्या चकमकीमध्ये मृत्यू झाला आहे. तर उमर आणि अली तुरुंगात आहेत. दोन्ही अल्पवयीन मुले बालगृहात आहेत.
वर्ष 2005 मध्ये जेव्हा बसपा आमदार राजू पाल यांची हत्या झाली तेव्हा संपूर्ण देशात त्याची चर्चा सुरू झाली. मायावती मुख्यमंत्री होताच त्यांनी अतिक आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली. यानंतर शाइस्ताही अतिकच्या टोळी आणि व्यवसायात सक्रिय झाली.
2012 मध्ये सरकार बदलले तेव्हा अतिक तुरुंगातून बाहेर आला. वर्ष 2014 मध्ये सपाने त्याला श्रावस्तीमधून उमेदवारी दिली, पण त्याचा पराभव झाला. 2016 मध्ये अखिलेश यादव यांच्यासोबत वाद झाला तेव्हा त्यांनी तिकीट कापले. 2017 मध्ये भाजपचे सरकार स्थापन होताच अतिकचे वाईट दिवस सुरू झाले.
2018 मध्ये अतिकने तुरुंगातूनच फुलपूर लोकसभा पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पहिल्यांदाच शाइस्ता परवीन प्रचारासाठी घराबाहेर पडली. मात्र, अतिक निवडणुकीत पडला.
अतिक आणि अशरफ हे आधीच तुरुंगात होते. उमरही खंडणीप्रकरणी तुरुंगात गेल्यानंतर अतिकचा प्रभाव कमी होऊ लागला. यानंतर 2021 मध्ये, अतिकच्या कुटुंबाने एमआयएम पक्षात प्रवेश केला. अतिक आणि दोन्ही मुले तुरुंगात गेल्यानंतर शाईस्ताने टोळी आणि व्यवसाय हाताळण्यास सुरुवात केली. धाकटा मुलगा असदही सक्रिय झाला. हे दोघे मिळून प्रयागराजपासून अनेक जिल्ह्यांतील बिल्डर आणि व्यापाऱ्यांना धमकावून खंडणी मागायचे.
शाइस्तालाही राजकारणात वेगळे स्थान निर्माण करायचे होते, म्हणूनच तिने 5 जानेवारी 2023 रोजी बसपचे सदस्यत्व घेतले. बसपाच्या तिकिटावर प्रयागराजची महापौर होईल, अशी शाइस्ताला आशा होती. मात्र फेब्रुवारीमध्ये उमेश पाल यांची हत्या झाली होती. त्याचा आरोप अतिक आणि त्याच्या कुटुंबीयांवर होता. यामध्ये शाइस्तालाही आरोपी करण्यात आले होते. यानंतर बसपने शाइस्ता यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला.
साबरमती कारागृहातून उमेश पालच्या हत्येला अतिकने ग्रीन सिग्नल दिला होता. यानंतर शाइस्ताने अतिकला खुनाच्या प्लॅनिंगमध्ये मदत केली. यासाठी शाइस्ताने साबरमती कारागृहात जाऊन अतिकची भेट घेतली. यादरम्यान शाइस्ताने अतिकला फोन दिला. उमेश पालच्या हत्येचे संपूर्ण नियोजन अतिकने फोनवरूनच केले. शाइस्ताने नेमबाज आणि इतर सर्व गोष्टींची जबाबदारी घेतली. अतिकने नेमबाज ठरवल्यावर शाइस्ताने त्याच्यासोबत बैठकही घेतली. याचे एक सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे.