चंदीगड – सोनिया गांधी यांचे जावई आणि प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी हरियाणात मोठा जमीन घोटाळा केल्याचा आरोप भाजपकडून सातत्याने केला जात होता. तो निवडणुकीतीलही मुद्दा ठरला होता. परंतु या आरोपात तथ्य नसल्याचा दावा हरियाणातील भाजप सरकारकडूनच करण्यात आला असून त्यांनी तसे प्रतिज्ञापत्र पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात सादर केले आहे.
रॉबर्ट वॉड्रा यांनी आपल्या मालकीच्या स्काय लाइट हॉस्पिटॅलिटी या कंपनीची जमीन डीएलएफ कंपनीला विकल्याच्या प्रकरणात कोणत्याही नियमांचे अथवा निर्बंधांचे उल्लंघन झालेले नाही असे हरियाणा सरकारनेच न्यायालयाला कळवले आहे. या प्रकरणात सप्टेंबर 2018 मध्ये हरियाणाचे तत्कालिन मुख्यमंत्री भुपेंद्र हुडा आणि रॉबर्ट वाड्रा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रतिज्ञापत्रात हरियाणा सरकारने म्हटले आहे की, रॉबर्ट वाड्रा यांच्या कंपनीने साडे तीन एकरांची जमीन डीएलएफ युनिव्हर्सल लि. ला हस्तांतरीत करण्यात आल्याच्या प्रकरणात कोणत्याही नियमांचे उल्लंघन झालेले नाही असे मनेसरच्या तहसिलदाराने आपल्या अहवालात नमूद केले आहे.
या प्रकरणात झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी मात्र पोलिसांकडून सुरू आहे असेही सांगण्यात येत आहे. या चौकशीसाठी एक नवीन एसआयटी नेमण्यात आली आहे असेही राज्य सरकारने यात नमूद केले आहे. सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीत हा मोठा मुद्दा ठरला होता. नुह गावचे रहिवासी सुरिंदर शर्मा यांच्या तक्रारीवरून या कथित जमीन घोटाळ्याच्या संबंधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणात कोणताहीं गैरव्यवहार झालेला नाही असे स्पष्टीकरण कॉंग्रेस पक्ष, मुख्यमंत्री हुडा आणि रॉबर्ट वाड्रा यांनी वेळोवेळी दिले आहे. मुळात रॉबर्ट वाड्रा यांच्या कंपनीने डीएलएफ कंपनीला ही जमीन विकलेलीच नाही. त्या जमीनीची नोंद अजूनही रॉबर्ट वाड्रा यांच्याच नावावर आहे असे संबंधीत तहसिलदाराने आपल्या अहवालात नमूद केले आहे. डीएलएफ कंपनीला नियमांचा भंग करून साडे तीन एकर जमीन हस्तांतरीत करण्यात आल्याचे या संबंधात नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यामध्ये नमूद करण्यात आले होते.