मुंबई – ओमायक्रॉनची संसर्ग क्षमता जास्त असली तरी मनुष्यहानी करण्याची क्षमता कमी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जागतिक शेअर बाजाराचे निर्देशांक सावरत आहेत. परिणामी गेल्या तीन दिवसापासून भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक आगेकूच असलेले करीत असल्याचे दिसून आले. गुरुवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 384 अंकांनी वाढून 57,315 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 0.69 टक्क्यांनी म्हणजे 117 अंकांनी वाढून 17,072 अंकांवर बंद झाला.
आजच्या तेजीचे नेतृत्व माहिती-तंतज्ञान, वित्त आणि ऊर्जा क्षेत्राने केले. रुपयाच्या मूल्यात गेल्या काही दिवसांपासून वाढ होत असल्यामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढत आहे. पावर ग्रीड, आयटीसी, बजाज फायनान्स, इनफोसीस, टेक महिंद्रा, विप्रो, स्टेट बॅंकेच्या शेअरच्या भावात वाढ झाली. एअरटेल, सन फार्मा, मारुती, अल्ट्राटेक सिमेंट, एशियन पेंट्स, आयसीआयसीआय बॅंकेच्या शेअरच्या भावात घट झाली. असे असले तरी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी काल 827 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. हे गुंतवणूकदार गेल्या काही महिन्यापासून भारतीय शेअर बाजारातून एकतर्फी गुंतवणूक काढून घेत आहेत.
जिओजी वित्तीय सेवा या संस्थेचे विनोद नायर यांनी सांगीतले की, ओमायक्रॉनची भिती कमी झाली आहे. त्याचबरोबर अमेरीकेचा विकास दर 2.3 टक्क्यापर्यंत वाढला आहे. त्यामुळे अमेरीकेसह जागतीक शेअर बाजारातून सकारात्मक संदेश आले.
तेजी- मंदीचा अंदाज
निफ्टी 17,000 अंकाच्या महत्त्वाच्या पातळीच्या पुढे गेला आहे. जर निफ्टी पुन्हा या पातळीच्या खाली आला तर काही प्रमाणात करेक्शन होण्याची शक्यता आहे. अशा अवस्थेत निफ्टी 16,850 अंकांपर्यंत घसरू शकतो. मात्र परिस्थिती सकारात्मक राहिली तर निफ्टी 17,115 पर्यंत वाटचाल करेल असे कोटक सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक श्रीकांत चव्हाण यांनी सांगितले.