मुंबई – एसटी कर्मचाऱ्यांचा पगार अद्यापही रखडलेला आहे. परंतु एसटी कर्मचाऱ्यांचा पगार येत्या 24 तासांत होण्याची शक्यता आहे. तसेच सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी 350 कोटी रुपये देण्यात आले असल्याचीही माहिती मिळत आहे. तारीख उलटून गेल्यानंतरही पगार न झाल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. एसटी महामंडळासाठी दरमहा 360 कोटी रुपये पगारासाठी देण्याचे सरकारने न्यायालयामध्ये मान्य केले होते. परंतु मागील काही दिवसांपासून अपुरा निधी सरकारकडून दिला जात असल्याचे समोर आले आहे.
मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्यासोबत आज मंत्रालयात बैठक झाली. बैठकीमध्ये एसटी महामंडळाकडून मागील सहा महिन्यांचा बॅकलॉग भरण्यासाठी एक हजार कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. याबाबतही बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या बैठकीला परिवहन विभागाच्या आयुक्त एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते.
अर्थ विभागाकडून एसटी महामंडळाला आधी दिलेल्या रकमेचा हिशोब देण्यास सांगितले आहे. एसटी आंदोलनावेळी दर महिन्याला 7 ते 10 तारखेमध्ये पगार करण्याचे आश्वासन सरकारने कोर्टात दिले होते. मात्र दर महिन्यात पगाराला उशीर होत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी बघायला मिळत आहे.