पुणे – सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि क्रीडा जागृती संयुक्तरीत्या चौथ्या महाराष्ट्र राज्य रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हि स्पर्धा २२ ते २४ डिसेंबर या कालावधीत बारामती येथे होणार आहे, अशी माहिती सीएफआयचे उपाध्यक्ष प्रताप जाधव यांनी दिली.
आगामी विजयपूर (कर्नाटक) येथे होणाऱ्या २८व्या राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्र संघामधील सायकलपट्टूंची निवड सुद्धा या राज्य रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेमधून करण्यात येणार आहे. हि राष्ट्रीय स्पर्धा ९ ते १३ जानेवारी दरम्यान होणार आहे. आंतरराष्ट्रीय पदकविजेती सायकलपट्टू कोल्हापूरची पूजा दानोले ही या स्पर्धेचे आकर्षण असून राष्ट्रीय पदक विजेती व एमटीबी सायकलिंग मधील आंतरराष्ट्रीय पदक विजेती, नगरच्या पेमराज सारडा महाविद्यालयाची प्रणिता सोमन, नाशिकची ऋतिका गायकवाड, कोल्हापूरची रंजीता घोरपडे, बारामतीची राधीका दराडे, नवी मुंबईची स्नेहल माळी, पुणे क्रीडा प्रबोधिनीची आदिती डोंगरे, जळगावची आकांक्षा म्हेत्रे यांच्यासह पुरुषामध्ये राष्ट्रीय पदक विजेता पिंपरी चिंचवडचा सुर्या थात्तु, पुण्याचा अदीप वाघ, प्रणव कांबळे, मुंबई शहरचा विवान सप्रु, नागपुरचा तेजस धांडे यांनी या स्पर्धेतील आपला सहभाग निश्चित केला आहे.
या स्पर्धेचे स्पर्धा संचालक आहेत तर मुख्यपंच म्हणून आंतरराष्ट्रीय पंच नवी मुंबईचे सुदाम रोकडे, काम पहणार आहेत तर दिपाली पाटील, धरमेंदर लांबा, उत्तम नाळे, मिलींद झोडगे, साईनाथ थोरात इत्यादी वेळ व्यवस्थापन/निर्णय पंच, पंच आणि पायलेट म्हणून काम पाहणार आहेत.