प्रकाश गद्रे
गुड फ्रायडे वर्षातून एकदा, इस्टर संडेच्या दोन दिवस आधी येतो. या लेखातून गुड फ्रायडेचा नेमका अर्थ काय आहे, हे समजावून घेऊया. 2022 वर्षांपूर्वी पॅलेस्टाइन देशात, यरुशलेम या शहरात कोणा एकास अपराधी समजून हेव्यापोटी क्रुसावर चढविण्यात आले, ती तरुण व्यक्ती यहुदी होती. त्यांनी समाजामध्ये सर्व काही चांगले केले होते, अशी ग्वाही, साक्ष त्यांच्याविषयी स्थानिक यहुदी देत होते. कारण त्यांनी पुष्कळ रोग्यांस बरे केले होते, अंधांना दृष्टी दिली होती, मुक्यांना बोलते केले होते, कुष्ठरोग्यांना व नाना प्रकारच्या दुखितास त्यांनी रोगमुक्त केले. देवाचे राज्य जवळ आले आहे, असे सांगत लोकांना आपले अंतःकरण पवित्र करण्यास व पापांपासून माघारी फिरण्यास ते सांगत असत. पुष्कळांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला व त्यांचे अनुयायी बनले.
संपूर्ण समाजात त्यांनी मन परिवर्तनाचे शिक्षण व पवित्र जीवन कसे जगावे याचे मार्गदर्शन करीत, लोकांना देवाचा मार्ग शिकविला. परंतु समाजातील काही पुढारी, संत म्हणविणाऱ्यांना त्यांचे शिक्षण पटले नाही म्हणून हेव्याने व स्वार्थाने त्यांनी त्यांच्यावर खोटे आरोप करून क्रुसावर चढविले. ज्यावेळी त्यांची चौकशी होत होती. त्यांच्यावर आरोप लादण्यात येत होते, त्यावेळेस ते गप्प राहिले. कारण एक दिवस त्यांस संपूर्ण मानवाच्या उद्धारासाठी (मोक्षासाठी) मरावे लागणार होते. जे घडत होते ते अगोदरच पवित्र शास्त्रलेखात त्याबाबत लिहून ठेवले होते व त्याप्रमाणेच सर्व घडत गेले. सरतेशवेटी त्यांस क्रुसावर चढविण्यात आले. तेव्हा ते म्हणाले, “हे बापा, ह्यांना क्षमा कर, कारण हे काय करीत आहे ह्यांना समजत नाही.’
हे कोण आहेत की, स्वर्गातील देवाकडे, तुमच्या आमच्यासाठी क्षमेची याचना करीत आहेत? आम्हाला “क्षमा’ मिळावी म्हणून हे, मानवाकरिता “मरण’ सहन करीत आहेत? त्यांचे नाव आहे, प्रभू यशू ख्रिस्त. जे मानवाकरिता क्रुसावर गेले. त्यांनी आम्हाला “क्षमा’ जाहीर केली. त्यासाठी प्रभू येशू वधस्तंभी गेले. त्यांनी आपले मौल्यवान रक्त सांडले, ते याच कारणासाठी. कारण सर्व ग्रंथांमध्ये आपण वाचतो की, रक्त सांडल्याशिवाय पाप क्षमा (मोक्ष, तारण) मिळत नाही. प्रभू येशूंचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करते.
आपल्याला उत्तम व चांगले जीवन (सार्वकालिक) मिळावे म्हणूनच तर प्रभू येशू क्रुसावर गेले. या दिवसाला गुड फ्रायडे म्हणून ओळखले जाते. त्यामुळे आपण प्रभू यशूंना आपल्या हृदयात, विश्वासाने स्वीकारून म्हणतो की, येशू हे खरोखरच प्रभू आहेत, म्हणूनच आम्हा मानवाचा पापापासून उद्धार (तारण) होतो.