लोणावळा – राज्य सरकारतर्फे अर्थमंत्री अजित पवार यांनी 2022-2023 चा अर्थसंकल्प विधानसभेत व अर्थ राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी विधान परिषदेत काल सादर केला. या अर्थसंकल्पात पर्यटन नगरी लोणावळा शहरातील सुप्रसिद्ध टायगर पॉइंट याठिकाणी स्कायवॉक उभारण्यात येणार असल्याची आणि त्यासाठी आर्थिक तरतूद केल्याची घोषणा अजित पवार यांनी केली. त्यांच्या घोषणेचे स्वागत लोणावळा शहरातील नागरिक, व्यावसायिक तसेच ट्रेकर्स संस्थांकडून करण्यात आले.
टायगर पॉईंट हा मुख्य शहरापासून साधारण 10 ते 12 किलोमीटर अंतरावर आहे. येथील निसर्ग सौंदर्य बघण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटन त्याठिकाणी येतात. वनविभागाच्या अखत्यारीत असलेल्या या पॉईंटवर वन विभागाच्या वतीने काही सोयीसुविधा करण्यात आल्या आहेत, मात्र, तुलनेत त्या खूपच नगण्य अशा आहे. काल जाहीर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात याठिकाणी स्कायवॉक सोबतच इतर सुविधा तयार करण्यात येणार असल्याचे अर्थमंत्री पवार म्हणाले.
यामुळे याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत निच्छितच मोठी वाढ होणार असून त्याचा फायदा लोणावळा शहराच्या एकूण अर्थव्यवस्थेवर सकारात्मक असाच होणार असल्याच्या प्रतिक्रिया येथील स्थानिक व्यावसायिकांकडून व्यक्त होत आहे. लोणावळा शहरातील एक सर्वांत मोठी ट्रेकिंग संस्था असलेल्या शिवदुर्ग मित्रचे सुनील गायकवाड यांनी वरील निर्णयावर समाधान व्यक्त केले असून या स्कायवॉक प्रोजेक्ट मुळे याठिकाणी पर्यटकांसाठी आवश्यक प्राथमिक सुविधा तसेच सुरक्षा व्यवस्था निर्माण होण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रिया दिली आहे.