सिंगापूर- देशातील अनेक कुटूंब कोरोनामुळे मेटाकुटीला आले आहे. त्यामुळे सिंगापूर सरकारने त्यावर एक शक्कल लढवली आहे. कोरोना महामारीच्या काळात मुलं जन्माला घालण्यासाठी लोकांना पैसे दिले जाणार आहे.
नागरिकांना देण्यात येणाऱ्या रकमेचा तपशील सरकारने जारी केलेला नाही. प्रोत्साहनपर दिली जाणारी ही रक्कम सरकारकडून देण्यात येणाऱ्या अनेक छोट्या बेबी बोनसच्या व्यतिरिक्त आहे. नागरिकांची मानसिक चिंता आणि ताण तणाव दूर करण्यासाठी सिंगापूर सरकारने हे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, जगातील सर्वात कमी जन्मदर सिंगापूरमध्ये आहे. तो वाढावा यासाठी अनेक वर्षांपासून लोकांना प्रोत्साहन दिले जात आहे. सिंगापूर हा देश आपले शेजारी असलेल्या इंडोनेशिया आणि फिलिपीन्सच्या तुलनेत अत्यंत वेगळा आहे. खरे तर या देशात, कोरोना व्हायरस लॉकडाउनच्या काळात मोठ्या प्रमाणावर गर्भधारणा होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती.