श्रीनगर – श्रीनगर शहराच्या नोवगाम भागात सीआरपीएफच्या पथकावर जो हल्ला करण्यात आला तो हल्ला लष्कर ए तोयबाकडूनच करण्यात आल्याचा निष्कर्ष वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी काढला आहे.
यात सैफुल्ला नावाचा पाकिस्तानी दहशतवादी सामील होता, अशीही माहिती पोलिसांना मिळाली आहे. आम्ही त्यांच्या मागावर असून त्यांचा लवकरच नायनाट केला जाईल, असेही संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.
या हल्ल्यात सीआरपीएफचे दोन जवान शहीद झाले असून अन्य तीन जण जखमी झाले आहेत. स्कूटरवरून आलेल्या हल्लेखोरांनी एके रायफलींद्वारे हा हल्ला केला.
हे हल्लेखोर आधीच कसे रोखले गेले नाही या प्रश्नाला उत्तर देताना काश्मीर विभागाचे पोलीस महानिरीक्षक विजयकुमार यांनी सांगितले की, काश्मिरात रस्त्यावरून सध्या मोठी वाहतूक सुरू आहे, त्यातील प्रत्येक वाहन तपासणी करणे पोलिसांना अशक्य आहे.
अशा प्रकारचे हल्ले जरी होत असले तरी लोकांनी घाबरून जायचे कारण नाही, परिस्थिती पूर्ण नियंत्रणाखाली आहे.