शेवगाव, दि. 24 – शेवगावच्या मध्य वस्तीतील मारवाडी गल्लीतील आडत व्यापारी तथा माहेश्वरी सभेच्या युवा शाखेचे जिल्हाध्यक्ष गौरेश बलदवा यांच्या राहत्या घरी पडलेल्या सशस्त्र दरोड्याच्या घटनेच्या निषेधार्थ जिल्हा माहेश्वरी सभा व ग्रामस्थांतर्फे येथील तहसील कार्यालयावर आज (शनिवार) शिस्तबद्ध मूक मोर्चा काढला.
शहरातील बालाजी मंदिरापासून निघालेला हा मूक मोर्चा मुख्य बाजारपेठमार्गे तहसील कार्यालयावर आल्यानंतर तेथे पार पडलेल्या निषेध सभेत आ. मोनिका राजळे, परतूरचे माजी आ. सुरेश जेठलिया, राष्ट्रवादी प्रदेश चिटणीस प्रताप ढाकणे, माजी सभापती डॉ. क्षितिज घुले, ज्येष्ठ नेते अरुण पाटील लांडे, संजय कोळगे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, माहेश्वरी सभेचे प्रदेशाध्यक्ष मधुसूदन गांधी, सचिव सत्यनारायण सारडा, महेश सोमाणी, नाशिकचे उमेश मुंदडा, माहेश्वरी सभेच्या महिला जिल्हाध्यक्षा किरण डागा, तीर्थपुरीच्या राधिका झंवर आदींनी या घटनेबाबत तीव्र निषेध व्यक्त करून पोलिस प्रशासनाने या घटनेचा तातडीने शोध लावावा, तसेच जलद गती न्यायालयाच्या माध्यमातून गुन्ह्याचा निकाल लावण्याची मागणी केली.
माहेश्वरी समाज शांतताप्रिय असून, तो ठराविक चाकोरीबाहेर कधीही जात नाही. मात्र, अनेकदा समाजकंटकांकडून समाजातील निरपराध लोकांना लक्ष्य करण्यात येते. शेवगावातील बलदवा कुटुंबावर झालेला हा आघात राज्यातील तमाम समाज बांधवावर झालेला आहे. केवळ माहेश्वरी समाजच नव्हे, तर शेवगावातील तमाम जनतेला दहशतीतून बाहेर काढण्यासाठी पोलिस प्रशासनाने कसब दाखविण्याची आवश्यकता या वेळी व्यक्त करण्यात आली.
या वेळी राज्यभरातील माहेश्वरी सभेचे पदाधिकारी, तसेच पाथर्डी, नेवासा, संगमनेर, अकोले, पैठण, संभाजीनगर, जालना, परभणी, पुणे, नाशिक आदी ठिकाणचे समाजबांधव सहभागी झाले होते. या वेळी महिलांची संख्या लक्षणीय होती.
माहेश्वरी सभेचे जिल्हाध्यक्ष मनेष बाहेती यांनी सूत्रसंचालन केले. तालुकाध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम बिहाणी यांनी आभार मानले. संघटनेतर्फे दिलेले निवेदन प्रशिक्षणार्थी नायब तहसीलदार रवींद्र सानप यांनी स्वीकारले. उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी बी. चंद्रकांत रेड्डी, पोलिस निरीक्षक विलास पुजारी उपस्थित होते.