पिंपरी – आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेत, सर्वच राजकीय पक्षांनी गणेशोत्सवानिमित्त फलकबाजी करीत शक्तीप्रदर्शन करीत असल्याचे दिसून आले. मात्र या शक्तीप्रदर्शनात “स्वच्छ व सुंदर पिंपरी चिंचवड’ या ब्रीद वाक्यालाच लोकप्रतिनिधींकडून हरताळ फासल्याचे दिसून येते. त्यामुळे स्वच्छ नव्हे तर विद्रुप पिंपरी चिंचवड शहर, असे काहीसे चित्र शहरातील चौका-चौकांत लावलेल्या फलकांवरून दिसून आले.
पिंपरी चिंचवड महापालिकेकडून सध्या शहरात स्वच्छ व सुंदर शहराकरिता विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. या अंतर्गत शहर स्वच्छ करण्याबरोबर आपला परिसर स्वच्छ रहावा, यासाठी स्वयंसेवी संस्था, शाळकरी मुलांच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. महापालिकेच्या माध्यमातून रोजच्या रोज शहर स्वच्छतेचे महत्त्व शहरवासीयांच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी घंटागाडीवरून विविध गाणी वाजविण्यात येत आहेत. पिंपरी चिंचवडकरांना स्वच्छतेचे महत्त्वावर धडे देणाऱ्या पालिकेचेच स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र शहराच्या विविध भागांतून समोर येत आहे.
दुसरीकडे आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेत, सर्वच राजकीय पक्षांनी गणेशोत्सवानिमित्त फलकबाजी करीत शक्तीप्रदर्शन करीत असल्याचे दिसून आले. शहरातील महत्त्वाच्या चौकाचौकांत, विसर्जन घाट परिसरात फलकबाजी करीत हे प्रदर्शन करण्यात आले. हे करताना मात्र, स्वच्छ व सुंदर पिंपरी चिंचवड या ब्रीद वाक्यालाच लोकप्रतिनिधींकडून हरताळ फासल्याचे दिसून येत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागापासून ते अगदी पुनावळे, मोशी, चिखली आदी भागातही सध्या अनधिकृत फलक लावण्यात आले असल्याचे दिसून येत आहे. यातही प्रत्येक पक्षाची चढाओढ सुरू असल्याचे दिसत आहे.
सुविधा महापालिकेची; बॅनरबाजी नेत्यांची
पिंपरी चिंचवड महापालिकेने विविध ठिकाणी घाटांवर लाइट, निर्माल्य कुंड, विसर्जन हौद आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. काही नेत्यांनी स्वत: ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे तर काही नेत्यांनी पालिकेच्या सुविधेवर स्वत:ची बॅनरबाजी केली आहे. काही नेत्यांनी बॅनरबाजी करून जणूकाही या सुविधा आपण दिल्या असल्याचे भासविण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे.