मुंबई : माजी मंत्री रामदास कदम यांचे सुपूत्र आणि शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या गाडीला भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूरजवळ हा अपघात झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
या अपघातात आमदार योगेश कदम यांच्या चालकासह तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. तर आमदार कदम या अपघातात सुदैवाने बचावले असून त्यांना किरकोळ मार लागल्याची माहिती मिळत आहे. आमदार कदम मुंबईकडे जात होते, याचवेळी त्यांच्या वाहनाला अपघात झाला आहे.
आमदार योगेश कदम हे माजी मंत्री व शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचे सुपूत्र आहेत. ते दापोली मतदारसंघाचे आमदार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, योगेश कदम मुंबईच्या दिशेनं जात असताना मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूरजवळ एका भरधाव डंपरने त्यांच्या वाहनाला धडक दिली. या अपघातात कदम यांच्या वाहनाचा चक्काचूर झाला आहे.